Louvre Museum : चोर गेले दागिने घेऊन, पण ‘शिडी’ने लुटली प्रसिद्धी; फोर्कलिफ्ट कंपनीचा भन्नाट मार्केटिंग स्टंट व्हायरल!

Louvre Museum । Bocker Agilo Forklift : फ्रान्सची राजधानी पॅरिसमधील जगप्रसिद्ध लूव्र म्युझियम येथे रविवारी सकाळी सुमारे ९ वाजता मोठी चोरी झाल्याची धक्कादायक घटना घडली. या दरोड्यात व्यावसायिक चोरांनी केवळ ७ मिनिटांत म्युझियममधून ऐतिहासिक आणि मौल्यवान दागिने लंपास केले आहेत.
फ्रान्सच्या मंत्री रशीदा दाती यांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरांनी म्युझियमची भिंत ओलांडून आत प्रवेश केला आणि डिस्क कटरच्या साहाय्याने खिडकी कापून चोरी केली. त्यांनी नेपोलियन बोनापार्ट आणि महाराणी जोसेफिन यांच्या संग्रहातील ८ दागिन्यांचा समावेश असलेले मौल्यवान संच पळवले आहेत. असं त्यांनी सांगितलं.
चोरट्यांनी चोरून नेलेल्या वस्तूंमध्ये १८५५ मध्ये बनवलेला ऐतिहासिक यूजनी क्राउन देखील होता. हा मुकुट हजारो मौल्यवान रत्नांनी जडवलेला असून फ्रान्सच्या गौरवशाली इतिहासाचे प्रतीक मानला जातो. पोलिसांना या मुकुट चे काही तुकडे घटनास्थळी तुटलेल्या अवस्थेत सापडले असून, चोरीदरम्यान तो पडल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या दरोड्यात जर्मन कंपनी बोकर मॅशिनेनवेर्के जीएमबीएच (Bocker Maschinenwerke GmbH) यांनी बनवलेल्या बोकर अॅगिलो फोर्कलिफ्ट (Bocker Agilo Forklift) चा वापर करण्यात आला होता. या घटनेनंतर कंपनीने नकारात्मक प्रसिद्धी टाळण्याऐवजी, विनोदी पद्धतीने त्याला मार्केटिंग संधीत रूपांतरित केले. आणि आपला फायदा कसा होईल याकडे लक्ष दिलं.
कंपनीने सोशल मीडियावर चोरीत वापरलेल्या फोर्कलिफ्टचा फोटो शेअर केला आणि कॅप्शन दिले “जेव्हा गोष्टी लवकर करायच्या असतात…” ही पोस्ट काही वेळातच व्हायरल झाली आणि इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरली. प्रसिद्धी साठी कंपनीला याचा चांगलाच फायदा झाल्याचं दिसून आलं आहे.
कंपनीचा स्पष्टीकरण :
बोकर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अलेक्झांडर बोकर यांनी सांगितले की, हा विनोद हलक्या-फुलक्या भावनेत करण्यात आला असून, कंपनी कोणत्याही प्रकारच्या गुन्हेगारी कृत्याचे समर्थन करत नाही. त्यांनी म्हटले, “आम्ही लोकांना नाही, वस्तूंना हलवतो. हा प्रसंग मान्य करण्याचा एक विनोदी मार्ग होता.”
सोशल मीडियावर या मोहिमेला मिश्र प्रतिक्रिया मिळाल्या. काहींनी बोकरच्या विनोदबुद्धीचे आणि मार्केटिंग कौशल्याचे कौतुक केले, तर काहींनी सांस्कृतिक वारसा लुटीवर विनोद करणे अनुचित असल्याचे म्हटले. तरीसुद्धा, ही पोस्ट जगभर व्हायरल झाली आणि इंस्टाग्राम, फेसबुक आणि लिंक्डइनसह अनेक माध्यमांवर चर्चेत राहिली.
चित्रपटसृष्टीला साजेशी चोरी :
ही घटना रविवारी सकाळी ९:३४ वाजता घडली. दोन चोरट्यांनी पिवळ्या जॅकेटमध्ये अपोलो गॅलरीत प्रवेश केला आणि फक्त ७ मिनिटांत सर्व मौल्यवान दागिने उचलून मोटारबाईकवरून पसार झाले. पॅरिसचे अभियोक्ता लॉरे बेक्यू यांच्या मते, चार जणांच्या टोळीने दोन-दोन गटांत विभागून चोरी केली. दोघे जण चेरी पिकर ट्रकमधून आत गेले, तर इतर दोघे मोटारबाईकवरून पळून गेले. या घटनेची रचना लोकप्रिय फ्रेंच टीव्ही सिरीज “ल्यूपिन” मधील एका चोरीच्या दृश्यासारखी असल्याचे लोक म्हणत आहेत.
शाही वारसा लंपास :
नेपोलियन तृतीयने सम्राज्ञी यूजिनीला दिलेला २,००० हिरे आणि २०० मोत्यांनी सजलेला मुकुट,
नेपोलियन बोनापार्टने मेरी-लुईससाठी दिलेली पन्ना आणि १,००० हिरे असलेली माळ,
तसेच राणी मेरी-अमेली हिचा नीलम–हिरा हेडपीस
चोरांनी मात्र एक १,३५४ हिरे आणि ५६ पन्ने असलेला पण नुकसानग्रस्त मुकुट तसाच सोडून दिला.





