फ्रान्सचे माजी राष्ट्राध्यक्ष सारकोझी यांना 5 वर्षांची शिक्षा; पॅरिस तुरुंगात दाखल, काय आहे प्रकरण?

पॅरिस : फ्रान्सचे माजी राष्ट्राध्यक्ष निकोलस सारकोझी यांना ५ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली असून, मंगळवारी ते पॅरिसच्या तुरुंगात दाखल झाले. लीबियाकडून मिळालेल्या बेकायदेशीर निधीतून त्यांनी २००७ मधील आपल्या निवडणुकीच्या प्रचारासाठी खर्च केला, या गुन्हेगारी कटामुळे त्यांना ही शिक्षा ठोठावण्यात आली आहे. आधुनिक फ्रान्समध्ये तुरुंगात जाणारे ते पहिले माजी राष्ट्राध्यक्ष ठरले आहेत.
तुरुंगात जाण्यासाठी सारकोझी पत्नी कार्ला ब्रूनी सारकोझी यांचा हात धरून घरातून बाहेर पडले आणि गाडीतून तुरुंगाकडे रवाना झाले. तुरुंगात जाण्यापूर्वी त्यांनी सोशल मीडियावर एक निवेदन जारी केले, ज्यात त्यांनी म्हटले, “एका निर्दोष व्यक्तीला तुरुंगात टाकले जात आहे.”
काय आहे नेमके प्रकरण?
गेल्या महिन्यात सारकोझी यांना दोषी ठरवण्यात आले होते. लीबियातून अवैध पद्धतीने पैसा घेऊन २००७ च्या अध्यक्षीय निवडणुकीसाठी निधी पुरवण्याचा कट त्यांनी रचला होता, असा त्यांच्यावर आरोप होता. सारकोझी यांनी शिक्षेवर आणि अपील प्रलंबित असताना तुरुंगात पाठवण्याच्या न्यायाधीशांच्या निर्णयाला आव्हान दिले आहे.
पत्नी आणि कुटुंबासोबत अखेरचा क्षण तुरुंगात दाखल होण्यापूर्वी काही मिनिटे सारकोझी आणि त्यांच्या पत्नीने मुलांची आणि नातवंडांची भेट घेतली. पॅरिसच्या उच्चभ्रू वस्तीत जमलेल्या समर्थकांच्या गर्दीकडे त्यांनी हात हलवला आणि गाडीत बसले. शेकडो समर्थकांनी टाळ्या वाजवून “निकोलस, निकोलस” च्या घोषणा दिल्या आणि फ्रान्सचे राष्ट्रगीत गायले.
तुरुंगात सोबत काय?
“मला तुरुंगाची भीती नाहीये. मी शेवटच्या श्वासापर्यंत लढेन,” असे सारकोझी यांनी एका वृत्तपत्राशी बोलताना सांगितले. त्यांनी तुरुंगात नेण्यासाठी आपले सामान तयार केले असून, त्यात कपडे आणि कुटुंबाचे १० फोटो ठेवले आहेत. ते तीन पुस्तकेही सोबत घेऊन जाणार आहेत.
सुरक्षेसाठी एकांत कारावास –
सारकोझी यांच्या वकिलांनी सांगितले की, सुरक्षा कारणास्तव माजी राष्ट्राध्यक्षांना एकांत कारावासात ठेवले जाईल, जिथे ते इतर कैद्यांपासून वेगळे राहतील. या अनुभवावर ते तुरुंगात एक पुस्तक लिहिण्याची योजना आखत असल्याचेही त्यांच्या वकिलांनी स्पष्ट केले आहे.





