Foreignchi Patlin : ‘फॉरेनची पाटलीण’ मधली जेनिफर सध्या काय करते? फोटो पाहून ओळखणं झालंय कठीण, अभिनय सोडून धरली योग गुरुची साथ…
दोघांची भेट दुबईतील एका योग कार्यक्रमादरम्यान झाल्याचं सांगितलं जातं. पुढे त्यांच्या नात्याचं रुपांतर विवाहात झालं. दोघांना मिला नावाची मुलगी आहे.

Foreignchi Patlin : मराठी चित्रपटसृष्टीचा इतिहास हा केवळ दमदार कथांचा आणि उत्तम अभिनयाचा नाही, तर प्रेक्षकांच्या मनात कायमची घर करणाऱ्या अनेक अविस्मरणीय पात्रांचाही आहे. काही चित्रपट असे असतात की ते एकदा पाहून समाधान होत नाही.
टीव्हीवर पुन्हा लागला की हातातील काम बाजूला ठेवून तो चित्रपट पाहण्याचा मोह आवरत नाही. ‘अशी ही बनवाबनवी’, ‘गंमत जंमत’ यांसारख्या विनोदी आणि कौटुंबिक चित्रपटांसोबतच ‘फॉरेनची पाटलीण’ हा चित्रपटही याच यादीत आवर्जून घेतला जातो.
२००८ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने आपल्या वेगळ्या कथानकामुळे आणि कलाकारांच्या अभिनयामुळे प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले. एका परदेशी तरुणीचं भारतीय मुलासोबत लग्न होतं आणि त्यानंतर ती महाराष्ट्रात येते.
नवीन देश, नवीन भाषा, नवीन संस्कृती आणि पूर्णपणे वेगळ्या परंपरांशी जुळवून घेताना तिच्या आयुष्यात अनेक गंमतीदार आणि भावनिक प्रसंग घडतात. त्यामुळे हा चित्रपट केवळ विनोदापुरता मर्यादित राहत नाही, तर परंपरा, नातेसंबंध आणि माणसांमधील जिव्हाळा यांचीही सुंदर गोष्ट सांगतो.
या सिनेमातील ‘जेनिफर’ हे पात्र आजही अनेकांच्या लक्षात आहे. मात्र हे पात्र साकारणारी अभिनेत्री नेमकी कोण होती, ती भारतात कशी आली आणि आज ती काय करते, हे तुम्हाला माहिती आहे का? ‘फॉरेनची पाटलीण’मध्ये जेनिफरची भूमिका बिलियाना रॅडोनिक (Biljana Radonjić) यांनी साकारली होती.
मूळची क्रोएशियाची असलेली बिलियाना मराठी चित्रपटात एका परदेशी मुलीची भूमिका साकारण्यासाठी भारतात आली आणि विशेष म्हणजे तिने आपल्या अभिनयासोबतच मराठी भाषेवरही चांगली पकड मिळवली. या चित्रपटात विनय आपटे, सुरेखा कुडची, तेजस्विनी पंडित आणि गिरीश परदेशी यांसारख्या कलाकारांनीही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या.
चित्रपटातील जेनिफर हे पात्र एका अमेरिकन तरुणीचं दाखवलं असलं तरी ते साकारणारी बिलियाना स्वतः अमेरिकन नव्हती. ती क्रोएशियाची होती. तिच्या आयुष्याची पार्श्वभूमीही तितकीच रंजक आहे.बिलियानाचा जन्म १९७७ मध्ये क्रोएशियामध्ये झाला.
तिच्या बालपणाच्या काळात युगोस्लाव्हियाच्या विघटनाच्या पार्श्वभूमीवर बाल्कन भागात संघर्ष आणि युद्धाची परिस्थिती निर्माण झाली. या अस्थिरतेचा तिच्या कुटुंबावरही परिणाम झाला आणि त्यांना स्थलांतर करावं लागलं. त्यानंतर बिलियानाने रोममध्ये उच्च शिक्षण पूर्ण केलं. पुढे भारताशी तिचं नातं एका स्टडी प्रोजेक्टच्या निमित्ताने जोडलं गेलं.
स्टडी प्रोजेक्टसाठी भारतात आली अन् ‘फॉरेनची पाटलीण’ मिळाला!
२००७-०८ च्या सुमारास बिलियाना एका स्टडी प्रोजेक्टसाठी भारतात आली होती. याच काळात मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक प्रदीप चोखंद्रे ‘फॉरेनची पाटलीण’साठी एका परदेशी मुलीच्या शोधात होते. या भूमिकेसाठी केवळ परदेशी चेहरा पुरेसा नव्हता, तर मराठी भाषेची जाण असलेली अभिनेत्री हवी होती. त्याच काळात बिलियानाचं नाव दिग्दर्शकांपर्यंत पोहोचलं आणि तिची या भूमिकेसाठी निवड झाली.
बिलियानाने ‘जेनिफर’ची भूमिका इतक्या सहजपणे साकारली की ती व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या मनात कायमची घर करून गेली. मराठी भाषेचा लहेजा, महाराष्ट्रातील संस्कृती समजून घेण्याचा प्रयत्न आणि अभिनयातील सहजता यामुळे ती भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे.
आता बिलियाना काय करते?
‘फॉरेनची पाटलीण’नंतर बिलियानाच्या आयुष्यात मोठा बदल झाला. तिचं नातं अध्यात्म आणि योगाशी जोडलेल्या मोहनजी (Mohanji) यांच्याशी आलं. मोहनजी हे आध्यात्मिक गुरु, योगी आणि समाजसेवक म्हणून ओळखले जातात.
दोघांची भेट दुबईतील एका योग कार्यक्रमादरम्यान झाल्याचं सांगितलं जातं. पुढे त्यांच्या नात्याचं रुपांतर विवाहात झालं. दोघांना मिला नावाची मुलगी आहे. बिलियानाने पुढील आयुष्यात अध्यात्म, योग आणि सामाजिक कार्याशी संबंधित क्षेत्रातही सक्रिय सहभाग घेतला. त्यामुळे मराठी चित्रपटातील ‘जेनिफर’पासून तिच्या आजच्या आयुष्यापर्यंतचा प्रवास हा नक्कीच वेगळा आणि रंजक आहे.









