Loni Kalbhor Police: हत्या अन् दागिन्यांची चोरी! २३ वर्षांनंतर पोलिसांनी ‘असा’ शोधला दागिन्यांचा मूळ मालक
Loni Kalbhor Police: उरुळी कांचन येथील २००३ मधील दरोडा व खून प्रकरणातील जप्त केलेले सोन्याचे दागिने न्यायालयाच्या आदेशाने फिर्यादीच्या स्वाधीन.

Loni Kalbhor Police – उरुळी कांचन (ता. हवेली) येथे 2003मध्ये झालेल्या दरोडा व खून प्रकरणात पोलिसांनी जप्त केलेले 14 ग्रॅम 390 मिलीग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने तब्बल 23 वर्षांनंतर मूळ फिर्यादीच्या ताब्यात देण्यात आले. लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे मुद्देमाल कारकून पोलीस हवालदार महेश चव्हाण यांनी गेल्या दोन वर्षांपासून केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे संबंधित महिलेचा शोध घेण्यात आला.
आवश्यक कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर न्यायालयाच्या आदेशाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप पवार यांच्या हस्ते अनिता दत्तात्रय टिपे यांना हा मुद्देमाल सुपूर्द करण्यात आला. उरुळी कांचन येथील गोसावी वस्ती परिसरात 8 जुलै 2003 रोजी रात्री दरोडा पडला होता. या घटनेत दत्तात्रय टिपे यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपासादरम्यान पोलिसांनी काही सोन्याचे दागिने जप्त केले होते. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये 6.340 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणी असलेले मंगळसूत्र, 480 मिलीग्रॅम वजनाची सोन्याची नथ, 4.800 ग्रॅम वजनाची सोन्याची बोरमाळ आणि 2.770 ग्रॅम वजनाचे सोन्याचे झुबे यांचा समावेश आहे. या सर्व दागिन्यांचे एकूण वजन 14 ग्रॅम 390 मिलीग्रॅम आहे.
गुन्ह्याला 23 वर्षांचा प्रदीर्घ कालावधी उलटल्याने जप्त मुद्देमालाचा हक्कदार शोधणे आणि तो संबंधित व्यक्तीच्या ताब्यात देण्यासाठी आवश्यक कागदपत्रे व न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे होते. दरम्यान, याच दरोडा व खून प्रकरणातील आरोपींविरुद्ध दाखल खटल्यात पुणे सत्र न्यायालयाने पुराव्यांतील त्रुटी आणि संशयाचा लाभ देत दोन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता केली होती.
मात्र, गुन्ह्यात जप्त झालेल्या सोन्याच्या दागिन्यांवरील फिर्यादीचा हक्क न्यायालयीन प्रक्रियेत कायम राहिला. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशानंतर 23 वर्षांनी हा ऐवज अनिता टिपे यांच्या ताब्यात देण्यात आला. दोन दशकांहून अधिक काळ लोटल्यानंतर पुन्हा हाती आलेला सोन्याचा ऐवज पाहून अनिता टिपे यांना मोठा दिलासा मिळाला. जुन्या गुन्ह्यांतील मुद्देमाल संबंधित हक्कदारांपर्यंत पोहोचविण्याच्या पोलिसांच्या प्रयत्नामुळे या प्रकरणाला न्यायालयीन प्रक्रियेत एक सकारात्मक पूर्णविराम मिळाला आहे.






