Lonavala Traffic: लोणावळ्याची वाहतूककोंडी फुटणार? पीएमआरडीएकडून कुमार चौक ते टायगर पॉइंट मार्गाची पाहणी
Lonavala Traffic: कुमार चौक ते टायगर पॉइंट आणि कुरवंडे रस्त्याचे रुंदीकरण वेगाने पूर्ण करण्याचे आदेश; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश.

Lonavala Traffic – पर्यटननगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोणावळ्यातील वाढती वाहतूककोंडी सोडवण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) पुढाकार घेतला आहे. मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्यानंतर पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी मंगळवारी (दि. ११) लोणावळा, सहारा पूल, भुशी, कुरवंडे, टायगर पॉइंट आणि लायन्स पॉइंट परिसरातील विकासकामांची पाहणी केली.
यावेळी कुमार चौक ते टायगर पॉइंट तसेच लोणावळा ते कुरवंडे रस्त्याचे काम ७ मीटर रुंदीने वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. पाहणी दौऱ्यावेळी आमदार सुनील शेळके, पीएमआरडीएच्या सहआयुक्त (जमीन व मालमत्ता) पूनम मेहता, मुख्य अभियंता शिवप्रसाद बागडी, कार्यकारी अभियंता शिवकुमार कुपल, अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागाचे सहआयुक्त हिम्मत खराडे, नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे,
उपनगराध्यक्ष देविदास कडू, नगरसेवक सनी दळवी, धनंजय काळोखे, मुख्याधिकारी अशोक साबळे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता भरतकुमार बाविस्कर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. लोणावळा परिसरात शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी पर्यटकांची मोठी गर्दी होते. अरुंद रस्ते आणि वाढलेली वाहनसंख्या यामुळे टायगर पॉइंट,
लायन्स पॉइंट तसेच भुशी परिसरात वाहतूककोंडीची समस्या गंभीर होत आहे. अनेकदा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. त्यामुळे स्थानिक नागरिकांसह पर्यटकांनाही मोठा त्रास सहन करावा लागतो. या पार्श्वभूमीवर रस्ते रुंदीकरण आणि पर्यटनस्थळांच्या पायाभूत सुविधांचा विकास करण्यावर पीएमआरडीएकडून भर देण्यात येत आहे. कुरवंडे येथील टायगर आणि लायन्स पॉइंट परिसरासाठी विकास आराखडा तयार करण्यात आला आहे.
या आराखड्यात १२५ मीटर लांबीच्या ग्लास स्कायवॉकचा समावेश आहे. तसेच भव्य प्रवेशद्वार, अद्ययावत उपाहारगृह, पार्किंग व्यवस्था आणि लँडस्केपिंगसारख्या सुविधा विकसित करण्यात येणार आहेत. या प्रकल्पांतर्गत सुमारे ११ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचाही विकास करण्यात येणार आहे. प्रकल्पाची तांत्रिक प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून रस्त्यांच्या कामाला मंजुरी मिळाल्याची माहिती देण्यात आली.
कुमार चौक ते भुशी गावापर्यंत १२ मीटरचा रस्ता
कुमार चौक ते भुशी गाव परिसरातील रस्त्यासाठी १२ मीटर रुंदी गृहीत धरून पुढील आराखडा तयार करण्यात येणार आहे. विकास आराखड्यानुसार या रस्त्याची प्रत्यक्ष रुंदी १५ मीटर आहे. प्रस्तावित १२ मीटर रुंदीमध्ये ७ मीटर मुख्य रस्ता वाहनांच्या वाहतुकीसाठी ठेवण्यात येणार आहे. उर्वरित पाच मीटर जागा दोन्ही बाजूंना ड्रेनेज आणि युटिलिटी लाइन्ससाठी वापरण्यात येणार आहे. त्यामुळे रस्ता विकासासोबतच पावसाळ्यातील पाणी निचरा आणि भविष्यातील पायाभूत सुविधांचाही विचार करण्यात आला आहे.






