Hoardings : होर्डिंग्जविरोधात पीएमआरडीएचा हातोडा, पण कारवाईचा वेग संथ!
Hoardings : ८२८ होर्डिंग्जचे सर्वेक्षण; ३७१ जणांना नोटिसा, प्रत्यक्षात १३४ होर्डिंग्जच हटवले

पिंपरी – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीत अनधिकृत आणि धोकादायक होर्डिंग्जविरोधात प्रशासनाकडून कारवाई सुरू असली, तरी प्रत्यक्ष निष्कासनाचा वेग तुलनेने संथ असल्याचे चित्र आहे.
आतापर्यंत ८२८ होर्डिंग्जचे सर्वेक्षण पूर्ण करून ३७१ होर्डिंगधारकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. मात्र, त्यापैकी केवळ १३४ अनधिकृत होर्डिंग्ज हटवण्यात आल्याने उर्वरित होर्डिंग्जवर कारवाई कधी होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पीएमआरडीएच्या अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागाकडून ही मोहीम राबविण्यात येत आहे. महानगर आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार आणि अतिरिक्त महानगर आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांच्या मार्गदर्शनाखाली, अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागाचे सहआयुक्त हिंमत खराडे यांच्या नेतृत्वात कारवाई सुरू आहे.
संपूर्ण पीएमआरडीए क्षेत्राची तहसीलदार (पूर्व) आणि तहसीलदार (पश्चिम) अशा दोन विभागांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. तहसीलदार (पूर्व) कार्यक्षेत्रात २८४ होर्डिंग्जचे सर्वेक्षण झाले असून, १३३ जणांना नोटिसा देण्यात आल्या आहेत.
यापैकी ९३ होर्डिंग्ज हटवण्यात आले आहेत. हवेली (पूर्व) तालुक्यात सर्वाधिक ५२ होर्डिंग्जवर कारवाई झाली असून, पुरंदरमध्ये १४, दौंडमध्ये १३, खेडमध्ये ७ आणि भोरमध्ये ७ होर्डिंग्ज हटवण्यात आले आहेत. शिरूरमध्ये ८१ होर्डिंग्जचे सर्वेक्षण झाले असून, पुढील कारवाई अद्याप बाकी आहे.
दरम्यान, तहसीलदार (पश्चिम) कार्यक्षेत्रात ५४४ होर्डिंग्जचे सर्वेक्षण करून २३८ जणांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. मात्र, येथे आतापर्यंत केवळ ४१ होर्डिंग्ज निष्कासित करण्यात आले आहेत. मुळशी (दक्षिण व उत्तर) येथे २३, मावळमध्ये १३ आणि हवेली (पश्चिम) येथे ५ होर्डिंग्ज हटवण्यात आले आहेत.
महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ मधील कलम ५३ (१) अन्वये कारवाई सुरू असली, तरी नोटीस बजावलेल्या सर्व होर्डिंग्जवर तातडीने कारवाई होणे गरजेचे आहे. विशेषतः पावसाळ्यात वादळी वाऱ्यामुळे होर्डिंग्ज कोसळण्याचा धोका वाढत असल्याने कारवाईला अधिक वेग देण्याची आवश्यकता आहे.
“अनधिकृत आणि धोकादायक होर्डिंग्जमुळे नागरिकांच्या जिवाला मोठा धोका निर्माण होतो. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी ही मोहीम यापुढे अधिक तीव्र केली जाईल. नोटीस मिळूनही निर्धारित वेळेत स्वतःहून होर्डिंग्ज न हटवल्यास पीएमआरडीएच्या वतीने ते निष्कासित केले जातील आणि कायदेशीर कारवाई प्रस्तावित केली जाईल.”
– हिंमत खराडे, सहआयुक्त, अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभाग, पीएमआरडीए.





