PMRDA Bypasses: चाकण, तळेगावची वाहतूककोंडी फुटणार! ‘पीएमआरडीए’चे चार नवे बायपास प्रस्तावित
PMRDA Bypasses: भूसंपादन प्रक्रिया प्रगतीत, १००.१४ कोटींची प्रशासकीय मान्यता

पिंपरी – राज्याचे प्रमुख औद्योगिक केंद्र असलेल्या चाकण आणि तळेगाव परिसरातील वाहतूककोंडीचा वनवास लवकरच संपण्याची चिन्हे आहेत.
पुणे-नाशिक महामार्गावरील ताण कमी करण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) चार पर्यायी बाह्यवळण मार्ग (बायपास) प्रस्तावित केले असून, त्यांच्या भूसंपादनाची प्रक्रिया प्रगतीत आहे.
तसेच, परिसरातील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी ‘चाकण डेडलॉक वर्क’ अंतर्गत विविध रस्त्यांच्या विकासासाठी १००.१४ कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
चाकण आणि तळेगाव औद्योगिक वसाहतींमध्ये (एमआयडीसी) रोजगारासाठी येणाऱ्या नोकरदारांची आणि अवजड वाहनांची मोठी वर्दळ असते.
वाढते नागरीकरण आणि अपुऱ्या पायाभूत सुविधांमुळे येथील वाहतूककोंडीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी ‘पीएमआरडीए’ने पूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही बाजूंनी बाह्यवळण मार्ग आखले आहेत.
असे असतील प्रस्तावित बायपास
१. हिंगणे चौक ते खराबवाडी
तळेगाव-चाकण महामार्ग क्रमांक ५० वरील हिंगणे चौक ते चाकण औद्योगिक वसाहत टप्पा ३ मधील फोक्सवॅगन कंपनी (खराबवाडी) यांना जोडणारा ०.९०० किमी लांबीचा व ३० मीटर रुंदीचा हा रस्ता आहे. यामुळे तळवडे, तळेगाव तसेच चाकण औद्योगिक वसाहतीतील टप्पा २ व ३ मधील वाहतूक थेट पुणे-नाशिक महामार्ग क्रमांक ६० ला जोडली जाईल.
२. सॅनी कंपनी ते समृद्धी सीएनजी पंप (नाणेकरवाडी)
१.२०० किमी लांबीचा व १५ मीटर रुंदीचा हा रस्ता तळेगाव तसेच औद्योगिक क्षेत्रातील टप्पा २ व ३ ला थेट पुणे-नाशिक महामार्गाशी (रा. मा. ६०) जोडेल.
३. बंगला वस्ती चौक ते रासे फाटा (मेदनकरवाडी)
२.५०० किमी लांबीचा आणि ३६ मीटर रुंदीचा हा रस्ता पुणे शहर, तळेगाव आणि औद्योगिक टप्पा २ व ३ ला पुणे-नाशिक महामार्ग क्रमांक ६० (बंगला वस्ती चौक) वरून थेट रासे फाटा येथील शिक्रापूर राज्य मार्ग क्रमांक ५५ शी जोडणारा अत्यंत महत्त्वाचा दुवा ठरेल.
४. पश्चिम बाह्यवळण मार्ग
पुणे-नाशिक महामार्ग (एनएच ६०) ते थेट चाकण एमआयडीसी टप्पा ५ ला जोडणारा ०.८५० किमी लांबीचा व ४५ मीटर रुंदीचा हा प्रशस्त रस्ता आहे. औद्योगिक वसाहतीतील जड वाहतुकीस हा मार्ग अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
चाकण आणि तळेगाव पट्ट्यातील अंतर्गत वाहतूक अधिक गतिमान करण्यासाठी ‘पीएमआरडीए’ने एकूण सात प्रमुख रस्ते (प्रजिमा, डीपी आणि एमआयडीसी रस्ते) विकसित करण्याचे काम हाती घेतले आहे.
या १७.०५ किमी लांबीच्या प्रकल्पासाठी २६ सप्टेंबर २०२५ रोजी १००.१४ कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. हे काम मे. क्रिष्णाई इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड (पुणे) यांना देण्यात आले असून, २७ फेब्रुवारी २०२६ रोजी कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत. या सर्व कामांची विहित मुदत १२ महिने असून, सद्यस्थितीत सर्व कामे प्रगतीत आहेत.
पीएमआरडीएने हाती घेतलेले प्रमुख सात रस्ते
१. मौजे चिखली ते मोई (प्रजिमा १७) रस्त्याची सुधारणा – १.६५० किमी.
२. कुरुळी फाटा ते निघोजे (प्रजिमा ७७) रस्त्याची सुधारणा – २.५०० किमी.
३. पुणे-नाशिक रस्ता – आळंदी फाटा (चाकण) ते आळंदी रस्ता (प्रजिमा ७७) सुधारणा – ४.००० किमी.
४. पुणे-नाशिक रस्ता – आळंदी फाटा (चाकण) ते आळंदी रस्ता (प्रजिमा ७७) विकसित करणे – ३.९०० किमी.
५. चऱ्होली खुर्द ते आळंदी-मरकळ डीपी रस्त्याची सुधारणा – २.००० किमी.
६. निघोजे ते चाकण एमआयडीसी रस्त्याची सुधारणा – १.२५० किमी.
७. खालुंब्रे ते एमआयडीसी फेज II रस्त्याची सुधारणा – १.७५० किमी.
“प्रस्तावित चार बाह्यवळण मार्गांसाठी भूसंपादनाची प्रक्रिया प्रगतीत आहे. हे प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचे आमचे नियोजन असून, त्यानंतर औद्योगिक क्षेत्रातील वाहतुकीचा प्रश्न बहुतांशी निकाली निघेल.” – शिवकुमार कुपल, कार्यकारी अभियंता, पीएमआरडीए





