Footballer Leg Insurance : मेस्सीच्या पायाची किंमत तब्बल ७ हजार कोटींपेक्षा जास्त! फुटबॉलपटू खेळण्यापूर्वी पायांचे इन्शुरन्स का करतात?
Footballer Leg Insurance : फुटबॉलपटूंचे सर्वात मोठे शस्त्र त्यांचे 'पाय' असतात. एखाद्या सैनिकासाठी जे स्थान तलवारीचे किंवा रायफलचे असते, तेच स्थान फुटबॉलपटूसाठी त्याच्या पायांचे असते.

Footballers Body Part Insurance Messi Ronaldo Neymar Leg Policy Cost : फुटबॉल हा जगातील सर्वात श्रीमंत, पण तेवढाच ‘रफ अँड टफ’ खेळ मानला जातो. मैदानावरील ९० मिनिटांच्या खेळात एक अचूक पास किंवा किक संपूर्ण सामन्याचा निकाल बदलू शकते. यासाठी फुटबॉलपटूंचे सर्वात मोठे शस्त्र त्यांचे ‘पाय’ असतात. एखाद्या सैनिकासाठी जे स्थान तलवारीचे किंवा रायफलचे असते, तेच स्थान फुटबॉलपटूसाठी त्याच्या पायांचे असते. त्यामुळे पायाला लागलेली एक किरकोळ दुखापतही खेळाडूचे करिअर संपवू शकते आणि स्पॉन्सर्सचे अब्जावधींचे नुकसान करू शकते. या आर्थिक विळख्यातून वाचण्यासाठी सध्या फुटबॉल जगतात ‘बॉडी पार्ट इन्शुरन्स’ (Body Part Insurance) हा एक उत्तम पर्याय बनला आहे.
मेस्सी-रोनाल्डोच्या पायांची किंमत ऐकून व्हाल चकित –
फुटबॉलपटूंचे पाय ही केवळ शरीराचा भाग नसून अब्जावधींची चालती-बोलती भांडवली संपत्ती आहे. रिपोर्ट्सनुसार, अर्जेंटिनाचा स्टार लिओनेल मेस्सीच्या डाव्या पायाचा विमा तब्बल ९०० दशलक्ष डॉलर्स (सुमारे ७,५०० कोटी रुपये) एवढा आहे. ख्रिस्तियानो रोनाल्डोने आपल्या दोन्ही पायांचा विमा १४४ दशलक्ष डॉलर्समध्ये केला आहे.
याशिवाय नेमार ज्युनियर (१२० दशलक्ष डॉलर्स), गॅरेथ बेल (१३२ दशलक्ष डॉलर्स) आणि माजी खेळाडू डेव्हिड बेकहॅम (१९५ दशलक्ष डॉलर्स) यांनीही आपल्या पायांचा विमा उतरवला आहे. जर दुखापतीमुळे या खेळाडूंचे करिअर अकाली संपले, तर विमा कंपनी त्यांना ही संपूर्ण रक्कम भरपाई म्हणून देते. मार्को व्हॅन बास्टेन आणि अबू दियाबी यांसारख्या अनेक दिग्गजांचे करिअर भयानक टॅकल्स आणि दुखापतींमुळे वेळेपूर्वीच संपले होते.
काय आहेत विम्याच्या कडक अटी?
हा विमा सामान्य विम्यासारखा नसून अत्यंत महागडा आणि वैयक्तिक गरजांनुसार तयार केला जातो. परंतु, यासाठी काही कडक अटी आहेत. हा विमा तेव्हाच लागू होतो जेव्हा खेळाडू फिफा मान्यताप्राप्त अधिकृत सामने किंवा आपल्या क्लबसाठी खेळत असतो. परदेशातील कोणतेही प्रदर्शनीय किंवा प्रमोशनल सामने यामध्ये कव्हर होत नाहीत. याच कारणामुळे अनेक मोठे फुटबॉलपटू फ्रेंडली किंवा इनव्हिटेशन सामने खेळणे टाळतात; कारण अशा सामन्यात दुखापत झाल्यास त्यांना मोठा आर्थिक फटका बसू शकतो. सध्या अनेक बडे क्लब्सही आपल्या खेळाडूंना हा विमा घेण्यासाठी प्रोत्साहित करत आहेत.





