पुणे | मुख्यमंत्री पदाबाबत निवडणुकीनंतर बघू

पुणे, {प्रभात वृत्तसेवा}- विधानसभा निवडणुकीत सरकार आल्यानंतर महायुतीचा मुख्यमंत्री कोण असेल ते ठरवू, असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री पदी कोण असेल या प्रश्नावर थेट बोलणे टाळले.
शासकीय विश्रामगृह येथील बैठकीनंतर उपमुख्यमंत्री पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. महायुतीच्या बैठका नुकत्याच झाल्या. त्यात मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा झाली का? महायुतीची सत्ता आल्यास मुख्यमंत्री कोण होणार ?, असे विचारले असता पवार यांनी सरकार आल्यानंतर ते ठरवू असे सांगत या प्रश्नाला बगल दिली.
तर वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात दोन शासकीय इमारतींचे भूमिपूजन होणार आहे. स्थानिक आमदार सुनील टिंगरे यांनी फ्लेक्स लावले असून त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो नाही, त्याबाबत भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्याबाबत विचारले असता पवार म्हणाले की, हा सरकारचा कार्यक्रम आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मी, असे ठरविले आहे की, त्या-त्या भागातील उद्घाटने त्या-त्या नेत्यांनी करायची. मागील वेळी सिंहगड रस्त्यावरील पुलाचे उद्घाटन मीच केले.
यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी, अधिकारी उपस्थित होते . याबाबींना तुम्ही जास्त महत्त्व देऊ नका, एखाद्याच्या मनात समज-गैरसमज असतील तर त्यांनी मी सांगितलेल्या गोष्टींची नोंद घ्यावी, असेही पवार यांनी यावेळी सांगितले.





