Pune District : गुळुंचवाडीत बिबट्याची दहशत
Pune District : दिवसाढवळ्या बिबट्या आढळून आल्याने शेतकरी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गुळुंचवाडी परिसरात यापूर्वीही बिबट्याने शेतकर्यांच्या पशुधनावर हल्ले केल्याच्या घटना घडल्या आहेत.

बेल्हे : जुन्नर तालुक्यात बिबट्यांची दहशत पुन्हा वाढली असून दिवसाढवळ्या बिबट्यांचे दर्शन होण्याच्या घटना समोर येत आहेत. गुळुंचवाडी (ता. जुन्नर) परिसरातील शिदरमुख येथे भर दुपारी बिबट्या दिसून आल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शिदरमुख परिसरातील निसर्गरम्य भागात बिबट्याने बराच वेळ ठिय्या मांडल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. दिवसाढवळ्या बिबट्या आढळून आल्याने शेतकरी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गुळुंचवाडी परिसरात यापूर्वीही बिबट्याने शेतकर्यांच्या पशुधनावर हल्ले केल्याच्या घटना घडल्या आहेत.
परिसरात मोठ्या प्रमाणावर शेती असल्याने शेतकर्यांना शेतीची कामे करण्यासाठी दररोज शेतात जावे लागते. मात्र, दिवसाढवळ्या बिबट्याचे दर्शन झाल्याने शेतकर्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्या परिसरातच वावरत असण्याची शक्यता असल्याने शेतकर्यांनी एकट्याने शेतात जाणे टाळावे, विशेषतः लहान मुले व महिलांनी काळजी घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. या घटनेची वनविभागाने गांभीर्याने दखल घेऊन शिदरमुख व गुळुंचवाडी परिसराची तातडीने पाहणी करावी. बिबट्याच्या हालचालींचा मागोवा घेऊन आवश्यक त्या ठिकाणी पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावे, तसेच नागरिकांना सतर्कतेच्या सूचना द्याव्यात, अशी मागणी गुळुंचवाडीचे उपसरपंच विजय गुंजाळ यांनी केली आहे.





