प्रभात वृत्तसेवा मंचर – नांदूर (ता. आंबेगाव) येथे सलग दुसर्या दिवशी बिबट्याने मेंढपाळ पलाजी तांबे यांच्या मेंढीवर हल्ला करून ठार केल्याची घटना घडली. या घटनेने ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.मेंढपाळ पलाजी तांबे यांनी नदीच्याकडेला बकर्यांना पाणी पाजण्यासाठी नेले असता तिथे दबा धरून बसलेल्या बिबट्याने मेंढीवर हल्ला करून ठार केल्याची घटना घडली. अंदाजे पंधरा ते वीस हजार रुपयांचे नुकसान झाले. मेंढपाळ पलाजी तांबे यांची शनिवारी (दि. 15) सायंकाळी बिबट्याने हल्ला करून घोडी ठार केली होती. त्यानंतर पुन्हा मेंढी ठार केल्यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. नांदूर गावामध्ये जाणारा मुख्य रस्ता दुरुस्तीचे काम असल्यामुळे बंद आहे. त्यामुळे नदीशेजारील एकमेव रस्ता सुरू असल्याने रात्री अपरात्री या रस्त्याने प्रवास करणे बिबट्याच्या भीतीने धोक्याचे झाले आहे. वनविभागाने ग्रामपंचायतीच्या मागणीनुसार वनरक्षक संपत तांदळे व त्यांच्या सहकार्यांनी आकाश साळवे यांच्या ट्रॅक्टरमधून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा आणून सोमवारी (दि. 17) सकाळी नांदूर स्मशानभूमीजवळ लावला आहे. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी अजूनही दोन-तीन पिंजरे लावून परिसरातील बिबटे लवकरात लवकर जेरबंद करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. वन विभागाचे संबंधित मेंढपाळाला शासनाच्या मार्फत जास्तीत जास्त भरपाई द्यावी. अशी मागणी माजी सरपंच शेखर चिखले, सरपंच पूनम वायाळ यांनी केली आहे. “शेतकरी, शाळकरी मुले यांनी रस्त्याने जाताना खबरदारी बाळगावी व शेतात काम करताना काळजी घ्यावी.” -विकास भोसले, वनपरिक्षेत्र अधिकारी मंचर.