कठुआतील दहशतवादी हल्ल्यात शहिद झालेल्या पाच सैनिकांबाबत जाणून घ्या अधिक माहिती…

Kathua Terrorist Attack| जम्मूतील कठुआ येथे 8 जुलै रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पाच जवान शहिद झाले. तर पाच जवान जखमी झाले. यानंतर दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी लष्कराची शोधमोहीम अजून सुरू आहे. कठुआच्या बडनोटामध्ये सुरक्षा दल शोध मोहीम राबवत असताना दहशतवाद्यांनी हा हल्ला केला. त्यानंतर दहशतवाद्यांनी जवानांच्या वाहनावर हल्ला केला.
या हल्ल्यात शहीद झालेले पाचही जवान उत्तराखंडचे रहिवासी आहेत. या दहशतवादी हल्ल्यात रायफलमन अनुज नेगी, कमल रावत, आदर्श नेगी, नायब सुभेदार आनंद सिंह आणि विनोद सिंह हे शहीद झाले. याबद्दल उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी मंगळवारी सांगितले की, ‘जम्मू आणि काश्मीरमधील कठुआ येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात उत्तराखंडचे पाच शूर जवान शहीद झाले. आपल्या सर्वांसाठी हा अत्यंत दुःखाचा क्षण आहे.’
शहीद अनुज नेगी – रायफलमन अनुज नेगी हा पौरी गढवालच्या धामधर रिखानिखल तहसीलच्या डोबरिया गावचे रहिवासी होते. शहीद अनुजच्या घरी आई-वडील, पत्नी आणि एक बहीण असा परिवार आहे. अनुजचे नोव्हेंबर २०२३ मध्येच लग्न झाले होते. त्यांच्या निधनाची माहिती मिळताच गावात शोककळा पसरली.
शहीद कमल सिंह रावत – शहीद हवालदार कमलसिंग रावत हे रिखनिखल तहसीलमधील पापरी नोदानू गावचे रहिवासी होते. त्यांची दोन मुले, पत्नी आणि आई असा परिवार आहे.
आदर्श नेगी – 26 वर्षीय आदर्श हे टिहरी जिल्ह्यातील कीर्तीनगर ब्लॉकमधील थाटी डागर गावचा रहिवासी होते. त्यांचे वडील दलबीर सिंह नेगी गावातच शेती करतात. आदर्शने सरकारी इंटर कॉलेज पिपलीधरमधून बारावीपर्यंत शिक्षण घेतले. तर गढवाल विद्यापीठातून बी.एस्सी. पूर्ण केली. 2019 मध्ये त्यांची गढवाल रायफल्समध्ये भरती झाले होते. तीन भावंडांमध्ये आदर्श सर्वात लहान होते. त्यांच्या बहिणीचे लग्न झाले आहे आणि भाऊ चेन्नईत काम करतो. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात मामाच्या मुलाच्या लग्नासाठी ते घरी आले होते.
विनोद सिंह भंडारी – जखानीधर ब्लॉकच्या चौंड-जसपूर येथील विनोद सिंह (३३) हे देखील कठुआमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झाले आहेत. विनोद हे 2011 मध्ये सैन्यात दाखल झाले होते. कुटुंबातील तो एकुलता एक मुलगा होता. विनोद यांना ४ वर्षांचा मुलगा आणि ४ महिन्यांची मुलगी आहे. दीड महिन्यापूर्वीच ते घरी आले होते. Kathua Terrorist Attack|
नायब सुभेदार आनंद सिंह –
गढवालचे रहिवासी नायब सुभेदार आनंद सिंह हे देखील कठुआ हल्ल्यात शहीद झाले होते. ते रुद्रप्रयाग जिल्ह्यातील कंदाखल गावचे रहिवासी होते. सोमवारी कठुआ हल्ल्यात त्यांना आपला जीव गमवावा लागला होता.
दरम्यान, बिलवारमधील माचेडी-किंडली-मल्हार रोडवर हा हल्ला झाल्याचे सांगण्यात येत आहे. येथे बडनोटा गावाजवळ माचेडी-किंडली-मल्हार रस्त्यावर लष्कराच्या वाहनातून सुरक्षा दलाचे 10 कर्मचारी नियमित गस्त घालत होते. मल्हार रस्त्यालगतच्या टेकडीवर दहशतवाद्यांनी ठाण मांडले होते. लष्करी वाहन पुढे जाताच दहशतवाद्यांनी घात केला आणि आधी ग्रेनेड फेकले आणि नंतर आधुनिक शस्त्रांनी गोळीबार सुरू केला होता. Kathua Terrorist Attack|
या हल्ल्यात सुमारे 3 दहशतवादी सामील असल्याचा संशय सुरक्षा यंत्रणांना आहे. एवढेच नाही तर हल्ल्यावेळी स्थानिक गाईडही दहशतवाद्यांसोबत असण्याची शक्यता आहे. काश्मीर टायगर्स या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. संघटनेचे म्हणणे आहे की या हल्ल्यात त्यांच्या कॅडरने M4 असॉल्ट रायफल, स्निपर, ग्रेनेड आणि इतर शस्त्रे वापरली आहेत.
हेही वाचा:





