Akshay Kumar : ‘लवकर बरा हो मित्रा, आपल्याला अजून…;’ मृत्यूशी झूंज देत असणाऱ्या अभिनेत्यासाठी अक्षयची भावूक पोस्ट
Akshay Kumar : बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अक्षय कुमारने सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर करत राजेश शर्मा यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

Akshay Kumar : बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेते राजेश शर्मा यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. प्रभासच्या आगामी ‘स्पिरीट’चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान एका विषारी किड्याने चावा घेतल्याने त्यांची तब्येत अचानक बिघडली. सध्या त्यांच्यावर पश्चिम बंगालमधील रुग्णालयात उपचार सुरू असून चाहते आणि चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार ते लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत.
बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अक्षय कुमारने सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर करत राजेश शर्मा यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. “माझा प्रिय मित्र राजेशच्या प्रकृतीबद्दल समजल्यानंतर मला खूप काळजी वाटत आहे. शूटिंगदरम्यान त्याला एका किड्याने चावा घेतल्याचे कळले. देव त्याचे रक्षण करो आणि तो लवकर बरा होवो. लवकर बरा हो मित्रा, आपल्याला अजून खूप हसायचे आहे.” असे पोस्टमध्ये अक्षयने म्हटलं आहे.
या पोस्टसोबत अक्षयने राजेश शर्मा यांच्यासोबतचा एक जुना आनंदी क्षण टिपणारा फोटोही शेअर केला आहे. राजेश शर्मा आणि अक्षय कुमार यांनी ‘भूत बंगला’, ‘स्पेशल 26’, ‘लक्ष्मी’, ‘मिशन राणीगंज’ आणि ‘टॉयलेट : एक प्रेम कथा’ या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. दोघांची आॅन स्क्रिन केमिस्ट्री प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली आहे.
हेही वाचा : Khed Heavy Rain: खेड तालुक्यात अतिवृष्टीचा हाहाकार! ५ जणांचा मृत्यू, तर ४५० हेक्टरवरील शेती उद्ध्वस्त
मिळालेल्या माहितीनुसार, राजेश शर्मा यांची प्रकृती चिंताजनक आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी त्यांच्या उपचारांचा सर्व खर्च उचलला आहे. पण दुसरीकडे या घटनेची चौकशी करण्याची मागणी देखील जोर धरू लागली आहे. विषारी किडा चावल्यामुळे राजेश यांच्या शिरीरात संसर्ग झपाट्याने वाढताना दिसत आहे. डॅाक्टरांची टीम त्यांच्यावर २४ तास लक्ष ठेवून आहे.
Very concerned to hear about my dear friend Rajesh’s health condition after an insect bite while shooting. Hope Mahadev blesses him with fast and complete recovery. Jaldi theek ho ja yaar, abhi saath baith ke bhot hansna hai. pic.twitter.com/n8yH6IYxKH
— Akshay Kumar (@akshaykumar) July 9, 2026
नेमकं काय घडलं?
बंगाली अभिनेत्री सुदीपा चॅटर्जी यांनी दिलेल्या माहितीनुसार, हैदराबादमध्ये ‘स्पिरिट’च्या शूटिंगदरम्यान राजेश शर्मा यांच्या पायाला एका विषारी किड्याने चावा घेतला. घनदाट जंगलात शुटिंग सुरू होती. त्यावेळी ही घटना घडली. सुरुवातीला गांभीर्य लक्षात आले नाही. मात्र, सहा तासांनंतर त्यांच्या पायात तीव्र वेदना सुरू झाल्या आणि संसर्ग वेगाने पसरू लागला. त्यानंतर त्यांची प्रकृती झपाट्याने खालावली. त्यानंतर राजेश शर्मा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
चाहत्यांकडून प्रार्थना
राजेश शर्मा यांनी ‘खोसला का घोसला’, ‘इश्किया’, ‘नो वन किल्ड जेसिका’, ‘चिल्लर पार्टी’, ‘द डर्टी पिक्चर’, ‘बीए पास’, ‘तनु वेड्स मनु रिटर्न्स’, ‘बजरंगी भाईजान’, ‘एम.एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी’ आणि ‘इंडियाज मोस्ट वॉन्टेड’ यांसारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटांमधून आपल्या दमदार अभिनयाची छाप पाडली आहे. त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी आणि ते पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर झळकावेत, अशी प्रार्थना चाहते करत आहेत.
हेही वाचा : Indrayani River Flood: चिंबळी-मोशी बंधारा केव्हाही कोसळणार? महापुरात ४० वर्षे जुना बंधारा धोक्यात





