Pune District : वकिलांच्या ’रस्त्यात झाड’ आंदोलनाला यश
Pune District : यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निष्क्रियतेचा निषेध करत तातडीने रस्ता दुरुस्त करण्याची मागणी करण्यात आली होती.

राजगुरुनगर : चांडोली फाट्याकडून राजगुरुनगर अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय तसेच कडूसकडे जाणार्या रस्त्यावरील खड्ड्यांविरोधात खेड वकील बार असोसिएशनने केलेल्या ’रस्त्यात झाड’ आंदोलनाला यश आले असून सार्वजनिक बांधकाम विभागाने या मार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम मंगळवारी सुरू केले आहे. पावसाचा जोर कमी झाल्यानंतर या रस्त्याचे कायमस्वरूपी डांबरीकरण करण्यात येईल, असे आश्वासनही विभागाकडून देण्यात आले आहे.
मुसळधार पावसामुळे न्यायालय मार्गाची मोठी दुरवस्था झाली होती. ठिकठिकाणी पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे न्यायालयात येणारे वकील, पक्षकार, विद्यार्थी, कामगार, ज्येष्ठ नागरिक आणि शासकीय अधिकारी यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने अपघाताचा धोका वाढला होता.
या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी खेड वकील बार असोसिएशनच्या वतीने सोमवारी (दि. 6) ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. पोपटराव तांबे पाटील आणि माजी अध्यक्ष अॅड. वैभव कर्वे यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये झाडे लावून अनोखे आंदोलन करण्यात आले. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निष्क्रियतेचा निषेध करत तातडीने रस्ता दुरुस्त करण्याची मागणी करण्यात आली होती.
या आंदोलनाची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी दाणी यांनी मंगळवारी प्रत्यक्ष पाहणी करून मोठ्या खड्ड्यांमध्ये मुरूम टाकून तात्पुरत्या स्वरूपात दुरुस्तीचे काम सुरू केले. तसेच पावसाळा ओसरल्यानंतर संपूर्ण मार्गाचे दर्जेदार डांबरीकरण करण्यात येईल, असे त्यांनी बार असोसिएशनच्या पदाधिकार्यांना आश्वासन दिले.
यावेळी खेड वकील बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. अतुल गोरडे, माजी अध्यक्ष अॅड. रोहिदास टाकळकर, अॅड. वैभव कर्वे, अॅड. अरुण मुळूक, अॅड. विजय भगत, अॅड. लहू तरडे, ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. राजेंद्र कुलकर्णी, अॅड. जे. बी. ओसवाल तसेच अॅड. संकेत वाघमारे उपस्थित होते. दरम्यान, प्रशासनाने दिलेल्या आश्वासनाची तातडीने अंमलबजावणी करून न्यायालय मार्गाचे दर्जेदार डांबरीकरण करावे; अन्यथा पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही खेड वकील बार असोसिएशनने दिला आहे.





