Amit Shah: दस्तऐवजाच्या डिजिटायझेशनचे लोकार्पण; गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते भारत इतिहास संशोधन मंडळात कार्यक्रम
कागदपत्रांद्वारे मराठा इतिहासाचा कालखंड उजेडात आणण्याचे काम

पुणे – भारत इतिहास संशोधक मंडळाच्या ऐतिहासिक कागदपत्रांच्या डिजिटायझेशन प्रकल्पाचे लोकार्पण काल (सोमवारी) केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शहा यांनी केले.
या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मुरकुंबी इतिहास उपक्रमाचे नरेंद्र मुरकुंबी, मंडळाचे अध्यक्ष प्रदीप रावत, सचिव पांडुरंग बलकवडे उपस्थित होते. कोषाध्यक्ष नंदकुमार निकम यांनी सूत्रसंचालन केले, तर बलकवडे यांनी आभार मानले.
भारत इतिहास संशोधक मंडळात गेल्या ११६ वर्षांपासून संशोधन होते. मंडळाने उपलब्ध कागदपत्रांद्वारे मराठा इतिहासाचा कालखंड उजेडात आणण्याचे काम केले आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या उपस्थितीत २०२१ मध्ये या प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला होता. त्याच्या पहिल्या टप्प्याचे आज लोकार्पण करण्यात आले. www.bismarchives.in या वेबसाइटवरून ही दुर्मिळ कागदपत्रे, तसेच अमूल्य वस्तूंची सचित्र माहिती घेता येणार आहे.
या डिजिटायझेशन प्रकल्पाचे काम चिन्मय भांडारी आणि मिथिलेश कुळकर्णी यांच्या न्यानसा कंपनीने माइंडस्केप हबच्या साहाय्याने केले आहे. मंडळाकडील सुमारे तीन लाख कागदपत्रांची सुमारे सहा लाख ४० हजार पृष्ठे (इमेजेस) लवकरच उपलब्ध होणार आहेत. त्यातील पहिल्या टप्प्यात सुमारे १० हजार कागदपत्रे वेबसाइटवर उपलब्ध झाली आहेत. यामध्ये बखरी, मुघल फर्माने, हस्तलिखिते, तसेच ताम्रपट, चित्रे, नकाशे, शिल्पे, शस्त्रे, शिलालेख, भूमिपत्रे, दुर्मिळ ग्रंथ याचा समावेश आहे.
भारतीय इतिहासाचे जागतिक स्तरावर प्रसारण होत असल्याचे या वेळी रावत यांनी सांगितले. या प्रकल्पासाठी मुरकुंबी इतिहास उपक्रम आणि भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर यांची मोलाची मदत झाली आहे.
उपस्थितांचा भ्रमनिरास
केंद्रीय गृहमंत्री शहा दुपारी १२ वाजता भारत इतिहास संशोधक मंदिरात येणार होते. मात्र, त्याआधीचे त्यांचे नियोजित कार्यक्रम लांबल्याने त्यांना यायला उशीर झाला. वि. का. राजवाडे सभागृहाची क्षमता शंभर आसनांची असून, निमंत्रितांचे नियोजनही केले होते.
अनेकजण अकरा- सव्वाअकराच्या दरम्यान आले. शहा सुमारे पावणेतीन वाजण्याच्या सुमारास आले. त्यांनी सत्कार स्वीकारून वेबसाइटचे लोकार्पण केले आणि एकही शब्द न उच्चारता निघून गेले. हा सगळा सोपस्कार दहा मिनिटांमध्ये उरकला. ते काहीतरी बोलतील याची वाट पाहात थांबलेल्या उपस्थितांचा मात्र चांगलाच भ्रमनिरास झाला.
सकाळपासूनच आस्थापनांना सुटी
सदाशिव पेठेत औषधे, हाॅटेल्स अन्य आस्थापना आहेत. त्यांनी दुपारी चारनंतर आपला व्यापार सुरू करायचा, असे रविवारीच पोलिसांनी सांगितले होते. त्यामुळे या भागातील व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. काही दुकानदारांनी सुटीच जाहीर केली. केवळ दहा मिनिटांसाठी पोलिसांना तिष्ठावे लागलेच; पण व्यापाऱ्यांनाही त्यांचा व्यवसाय बंद ठेवावा लागला.
CET Exam : ११ अभ्यासक्रमांसाठी दोन सीईटीची संधी; २१ सीईटी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर





