CET Exam : ११ अभ्यासक्रमांसाठी दोन सीईटीची संधी; २१ सीईटी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
CET Exam : मंत्री पाटील यांची घोषणा

पुणे – राज्य सीईटी सेलतर्फे शैक्षणिक वर्ष २०२७-२८ मध्ये घेण्यात येणाऱ्या पदवी आणि पदव्युत्तर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या २१ सीईटी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना अधिक संधी मिळण्यासाठी यंदा तीनऐवजी तब्बल ११ अभ्यासक्रमांसाठी दोन वेळा सीईटी परीक्षा घेतली जाणार आहे.
यात पीजीडीएम, पीजीसीएम आणि जीएनएम नर्सिंग या तीन अभ्यासक्रमांची सीईटी प्रथमच होणार असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
राष्ट्रीय स्तरावरील जेईई मेन परीक्षेच्या धर्तीवर गेल्या वर्षापासून राज्यात पीसीएम, पीसीबी आणि एमबीए या तीन अभ्यासक्रमांसाठी दोन वेळा सीईटी घेण्याचा प्रयोग यशस्वी ठरला. विद्यार्थ्यांचा वाढता प्रतिसाद पाहून यंदा आणखी आठ अभ्यासक्रमांची भर घातली असून, पाच वर्षीय एलएलबी, बीएचएमसीटी, बीसीए, बीबीए, बीएमएस, बीबीएम, तसेच नव्याने सुरू होणाऱ्या पीजीडीएम व पीजीसीएम यांचा समावेश आहे.
या सर्व ११ अभ्यासक्रमांची पहिली परीक्षा बंधनकारक असून, दुसरी संधी ऐच्छिक राहील. ज्या परीक्षेत अधिक पर्सेंटाइल असतील, तेच प्रवेशासाठी ग्राह्य धरले जातील.
जानेवारी ते १० जून २०२७ दरम्यान या सर्व परीक्षा पार पडतील. पीजीडीएम आणि पीजीसीएमची परीक्षा एमबीए सीईटीसोबतच होणार आहे. दुसरीकडे राज्यातील एकमेव संस्थेत असलेल्या तीन वर्षीय एकात्मिक बीएड-एमएड अभ्यासक्रमाला यंदा ५५ पैकी केवळ १२ प्रवेश झाल्याने त्याची सीईटी रद्द करण्यात आली आहे. विद्यार्थी आणि संस्थांच्या मागणीनुसार बीएड, एमएड आणि एमपीएडच्या परीक्षा यंदा जून महिन्यात घेतल्या जातील.
एमएचटी-सीईटी ८ एप्रिलपासून
अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी महत्त्वाची असलेली एमएचटी-सीईटी परीक्षा यंदा ८ एप्रिल २०२७ पासून सुरू होईल. पीसीबी आणि पीसीएम या दोन्ही समूहांच्या परीक्षा दोन वेळा घेतल्या जातील. पीसीबीची पहिली परीक्षा ८ ते १३ एप्रिल २०२७, तर दुसरी संधी ६ ते ८ मे २०२७ या कालावधीत असेल. पीसीएमची पहिली परीक्षा १६ ते २६ एप्रिल २०२७, तर दुसरी संधी १० ते १५ मे २०२७ दरम्यान मिळेल.
Pimpri-Chinchwad: उंच इमारतींची संख्या वाढली; अग्निशमन यंत्रणा मात्र मर्यादित!





