Pune District : घोडनदीला पूर, बेल्हे- जेजुरी राज्यमार्ग पाण्याखाली गेल्याने वाहतूक विस्कळीत
Pune District : संपूर्ण जून महिना कोरडा गेल्याने काही भागात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकऱ्यांची वाढलेली चिंता आठवडाभरात सुरु असलेल्या पावसामुळे दूर झाल्याचे दिसून येते.

जांबूत : संपूर्ण महाराष्ट्रासह पुणे जिल्ह्यात गेली पाच दिवसांपासून सुरु असलेल्या संततधार पावसाने बळीराजाचे समाधान केले आहे. संपूर्ण जून महिना कोरडा गेल्याने काही भागात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकऱ्यांची वाढलेली चिंता आठवडाभरात सुरु असलेल्या पावसामुळे दूर झाल्याचे दिसून येते.
उत्तर पुणे जिल्ह्यासह शिरूर, आंबेगाव , जुन्नर तालुक्याला वरदान ठरलेल्या हुतात्मा बाबू गेनु जलाशय (डिंभे धरण) पाणलोट क्षेत्रात मागील पाच दिवसांत विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. बुधवारी (दि. ८) रोजीचे अहवालानुसार डिंभे धरणात ३७ टक्क्यांहून अधिक पाणीसाठा तयार झाला असून सततच्या पावसाने शिरूर – आंबेगाव तालुक्याची जीवनदायिनी असलेल्या घोडनदीला मोठ्या प्रमाणात पूर आला आहे. (Pune District)
आलेल्या पुरामुळे या भागातून जाणारा बेल्हे- जेजुरी राज्यमार्ग हा पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूक प्रशासनाकडून बंद करण्यात आली असून शिरूर – आंबेगाव तालुक्यांना जोडणारा पिंपरखेड – देवगाव बंधारा देखील पाण्याखाली गेल्याने प्रशासनाकडून पर्यायी मार्गाचा वापर करण्याच्या सूचना नागरिकांना देण्यात आलेल्या आहेत. (Pune District)
या मार्गावरून अनेक शालेय विद्यार्थी आणि प्रवाशी ये- जा करत असून या भागात पावसाचा जोर वाढत असल्याने प्रवास करताना शालेय विद्यार्थ्यांनी योग्य ती काळजी घेणे गरजेचे असून नदीकाठच्या गावासांह नागरिकांनी सतर्क राहून खबरदारी घेण्याच्या सूचना पाटबंधारे विभाग आणि प्रशासनाकडून देण्यात येत आहे





