Pune Water Cut: पुणेकरांना मोठा दिलासा! पालखी सोहळ्यामुळे पुढील ५ दिवस पाणीकपात रद्द
Pune Water Cut: आळंदीत उद्भवलेल्या पुरामुळे पालखी सोहळ्यातील दिंड्या पुण्यातच मुक्कामी राहणार; महापौरांनी घेतला पाणीकपात रद्द करण्याचा निर्णय.

Pune Water Cut – आळंदी येथे उद्भवलेल्या पूरस्थितीमुळे पालखी सोहळ्यासाठी आलेल्या दिंड्या, तसेच वारकऱ्यांनी पुण्यातच थांबावे, असे आवाहन पालखी सोहळा व्यवस्थापनाकडून करण्यात आले आहे. त्यामुळे अनेक दिंड्या पुढील तीन ते चार दिवस पुण्यातच मुक्कामी राहणार असल्याने शहरात दिवसाआड असलेली पाणीकपात पुढील पाच दिवसांसाठी रद्द केल्याची माहिती महापौर मंजुषा नागपुरे यांनी दिली. याशिवाय ज्या महापालिकेच्या १०१ शाळांमध्ये दिंड्यांचा मुक्काम असतो,
त्या शाळांनाही पाच दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. हे निर्णय ७ जुलै ते १२ जुलै या कालावधीसाठी लागू राहणार आहेत. महापौर नागपुरे म्हणाल्या, की आळंदी येथे पूरस्थिती निर्माण झाल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तेथील परिस्थिती लक्षात घेऊन वारकऱ्यांनी पुण्यातच मुक्कामी थांबावे, असे आवाहन केले आहे. त्यानंतर तातडीने प्रशासनाची बैठक घेऊन वारकऱ्यांसाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले.
वारकऱ्यांची वाढलेली संख्या लक्षात घेऊन त्यांना पुरेसा पाणीपुरवठा होण्यासाठी १२ जुलैपर्यंत शहरात नियमित पाणीपुरवठा केला जाणार आहे, तसेच वारकरी ज्या महापालिकेच्या शाळांमध्ये मुक्कामी असतात, त्या शाळांना उद्यापासून सुट्टी देण्यात येणार आहे. याशिवाय शहरात तातडीने अतिरिक्त स्वच्छतागृहांची उभारणीही करण्यात येणार आहे.
वाहतूकीचे नियोजन करा
शहरात येणाऱ्या दिंड्यांची वाहने आणि वारकऱ्यांची संख्या लक्षात घेऊन पुढील पाच दिवस वाहतुकीचे योग्य नियोजन करावे, अशा सूचना त्यांनी पोलीस आयुक्त, तसेच वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. या कालावधीत शहरात वाहतूक कोंडी होऊ नये, तसेच वारकऱ्यांच्या वाहनांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्याच्या सूचनाही दिल्याचे महापौर नागपुरे यांनी स्पष्ट केले.




