– ऋषिकेश जंगम Mumbai – Dharavi slum tourism : मुंबईच्या मध्यवर्ती भागात वसलेली ‘धारावी‘ ( Dharavi ) ही आशियातील सर्वांत मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखली जाते. मात्र आज धारावीची ओळख केवळ झोपडपट्टीपुरती मर्यादित राहिलेली नाही. जगभरातील पर्यटकांसाठी ती एक वेगळा अनुभव देणारे पर्यटनस्थळ बनली आहे. होय.., ‘स्लम टुरिझम’ ( Dharavi slum tourism ) किंवा झोपडपट्टी पर्यटन या संकल्पनेमुळे धारावी पुन्हा एकदा चर्चेत आली असून, दोन तासांच्या सहलीसाठी हजारो रुपये मोजण्यास पर्यटक तयार असल्याचे वास्तव समोर आले आहे. आणि या ‘स्लम टुरिझम’ ने चक्क प्रसिद्ध ताजमहाला देखील मागे पाडलं आहे. स्लम टुरिझम म्हणजे काय? Dharavi slum tourism ‘स्लम टुरिझम’ (slum tourism) म्हणजे झोपडपट्टीतील लोकांचे वास्तव जीवन, त्यांचा संघर्ष, कामधंदे आणि सामाजिक परिस्थिती जवळून पाहण्यासाठी आयोजित केलेली एक सहल असते. पर्यटक गाईडसोबत अरुंद गल्ल्यांमधून फिरतात, स्थानिक उद्योग पाहतात आणि रहिवाशांच्या जीवनशैलीचा अनुभव जवळून घेतात. ही संकल्पना जगातील अनेक विकसनशील देशांमध्ये लोकप्रिय झाली आणि नंतर भारतातही पोहोचली. dharavi धारावीमध्ये अशा टूरसाठी परदेशी पर्यटकांकडून प्रतिव्यक्ती सुमारे १५ हजार रुपये आकारले जात असल्याची माहिती समोर आली आहे. भारतीय पर्यटकांसाठी हे शुल्क तुलनेने कमी असून १,५०० ते ७,००० रुपयांदरम्यान असते. स्थानिक युवक गाईड म्हणून काम करत पर्यटकांना आपल्या परिसराची माहिती देतात. आणि यातून ते पैसे सुद्धा कमवतात. धारावी पर्यटनाचं केंद्र कसं बनलं?Dharavi slum tourism २००० च्या दशकाच्या सुरुवातीला सामाजिक उपक्रम म्हणून ‘धारावी वॉक’ सुरू करण्यात आले होते. उद्देश होता स्थानिक विद्यार्थ्यांसाठी निधी उभारणे आणि धारावीबद्दलचे गैरसमज दूर करणे. कालांतराने हा उपक्रम व्यावसायिक पर्यटनात बदलला. आज सोशल मीडिया आणि ट्रॅव्हल प्लॅटफॉर्ममुळे ‘धारावी टूर’ची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. धारावीबद्दल बाहेरच्या जगात असलेली उत्सुकता हेही यामागील एक महत्त्वाचे कारण आहे. अनेक पर्यटकांना शहराच्या झगमगाटामागील वास्तव पाहण्याची इच्छा असते. यासोबतच धारावीत नेमकं काय घडत आणि तिथे लोक कसे राहतात? हे देखील जाऊन घेण्याची इच्छा अनेकांना असते. dharavi ब्रिटिश काळात झाली सुरुवात : गरिब राष्ट्र अशी ओळख असलेल्या अफ्रिकी देशांमध्ये 2006 मध्ये एक टूर ऑपरेटर कंपनीने जिवनाचं वास्तव दाखवण्यासाठी या स्लम ट्युरीझमची सुरूवात केली. ज्यामध्ये युगांडा, केनिया, केपटाउन सर्वांत पुढे आहे. आत ते भारतापर्यंत सुद्धा पोहचले आहे. खरंतर या ट्युरीझमची सुरुवात ब्रिटिश काळात झाली. असं म्हणायला हरकत नाही. कारण त्यावेळी ब्रिटिश लोक त्यांच्या वसाहती असलेल्या गरीब देशांमधील गरीब लोकांचे जीवन कस आहे. हे पाहण्यासाठी त्यांच्या वस्त्यांमध्ये जाणार मात्र यावर मानव अधिकार संस्थांकडून आक्षेप घेण्यात आला. कारण यातून स्लम ट्युरीझम सुरू झालं. आणि यासाठी ट्युरिस्ट कंपन्या श्रीमंताकडून यासाठी बक्कळ पैसा आकारत. मात्र त्याचा फायदा झोपडपट्टीतील लोकांना होत नव्हता. dharavi धारावीची अर्थव्यवस्था : धारावी सुमारे ५५० एकर परिसरात पसरलेली असून येथे अंदाजे दहा लाखांहून अधिक लोक राहतात. अत्यंत मर्यादित जागा असूनही येथे हजारो लघुउद्योग चालतात. चर्मोद्योग, मातीची भांडी, कपडा उद्योग, प्लास्टिक रिसायकलिंग आणि लघु उत्पादन यामुळे धारावीची स्थानिक अर्थव्यवस्था दरवर्षी अब्जावधी रुपयांची उलाढाल करते. धारावी केवळ राहण्याची जागा नसून ‘वर्क-लाइव्ह’ मॉडेलचे उदाहरण मानली जाते म्हणजेच काम आणि घर एकाच परिसरात असल्याने रहिवाशांना रोजगारासाठी दूर प्रवास करावा लागत नाही. या ठिकाणी 2019 च्या निवडणुकीच्यावेळी समोर आलेल्या आकड्यानुसार येथे दीड लाख मतदार आहेत. एवढेच नाही तर 2019 च्या ट्रॅव्हल वेबसाईट ट्रीप ॲडव्हायझर हा ‘ट्रॅव्हलर्स चॉईस’ पुरस्कार देखील धारावीला मिळाला होता. हा अवॉर्ड पर्यटकांच्या चॉईसच्या आधारावर दिला जातो. dharavi धारावीतलं दैनंदिन जीवन : धारावीतील जीवन अनेक विरोधाभासांनी भरलेले आहे. एका बाजूला अरुंद गल्ल्या, मर्यादित जागा आणि सामायिक सुविधा आहेत; तर दुसऱ्या बाजूला मजबूत सामाजिक नातेसंबंध, रोजगाराच्या संधी आणि उद्योगशीलता दिसून येते. अनेक घरांमध्ये आधुनिक सुविधा देखील उपलब्ध आहेत. शहराच्या मध्यभागी असल्यामुळे येथे राहणे अनेकांसाठी आर्थिकदृष्ट्या सोयीचे ठरते. वाद आणि नैतिक प्रश्न : स्लम टुरिझमवर टीकाही होते. काहींच्या मते हे ‘गरिबीचं प्रदर्शन’ आहे आणि पर्यटक कधी कधी स्थानिकांच्या खासगी आयुष्यात हस्तक्षेप करतात. परवानगीशिवाय फोटो काढणे, संवेदनशील भागांमध्ये फिरणे यामुळे रहिवाशांमध्ये नाराजी निर्माण झाल्याच्या घटना घडल्या आहेत. तज्ज्ञांच्या मते, अशा सहलींचा उद्देश शिक्षण आणि समज वाढवणे असावा; केवळ गरिबी पाहण्याचा अनुभव देणे नव्हे. जबाबदार पर्यटन आणि स्थानिकांचा सन्मान राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. dharavi भविष्यात काय बदलू शकतं? धारावी पुनर्विकास प्रकल्पामुळे येत्या काळात येथील जीवनमान बदलण्याची शक्यता आहे. पुनर्विकासानंतर पारंपरिक उद्योग आणि पर्यटनाचे स्वरूप बदलू शकते. सध्या स्लम टुरिझममुळे रोजगार मिळणाऱ्या अनेक युवकांना भविष्यात नवीन संधी शोधाव्या लागू शकतात. धारावी ही केवळ झोपडपट्टी नसून संघर्ष, जिद्द आणि उद्योजकतेची जिवंत कहाणी आहे. ‘स्लम टुरिझम’मुळे जगाला या वास्तवाची ओळख होत असली, तरी त्याकडे संवेदनशीलतेने पाहणे गरजेचे आहे. धारावीचा अनुभव हा गरिबीचा तमाशा नसून शहराच्या सामाजिक आणि आर्थिक वास्तवाचा आरसा आहे. आणि कदाचित याच कारणामुळे जगभरातील पर्यटकांना ती सतत आकर्षित करत आहे.