Lamine Yamal Messi : क्रिकेटमध्ये वैभव तर फुटबॉलमध्ये ‘हा’ १८ वर्षांचा मुलगा! मेस्सीचा वारसदार थेट वर्ल्डकप गाजवायला सज्ज
Lamine Yamal Messi : फुटबॉलच्या हिरव्या मैदानावरील एका १८ वर्षांच्या पोराने जगभरातील दिग्गजांना चक्रावून सोडले आहे.

Lamine Yamal Next Messi Barcelona FIFA World Cup 2026 : जागतिक क्रीडा जगतात सध्या दोन वेगवेगळ्या खेळांमधील दोन तरुण खेळाडूंच्या अफाट कामगिरीची जोरदार चर्चा सुरू आहे. क्रिकेटच्या मैदानात भारताचा अवघ्या १५ वर्षांचा डावखुरा सलामीवीर वैभव सूर्यवंशी आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेट गाजवून थेट भारतीय वरिष्ठ संघात दाखल झाला आहे. वैभवने क्रिकेटमध्ये नवा इतिहास रचला असतानाच, दुसरीकडे फुटबॉलच्या हिरव्या मैदानावरील एका १८ वर्षांच्या पोराने जगभरातील दिग्गजांना चक्रावून सोडले आहे. त्याचे नाव आहे लॅमिन यामल. वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी पदार्पण करणाऱ्या यामलला आतापासूनच जगातील ‘पुढचा मेस्सी’ म्हटले जात आहे.
“मला मेस्सी नाही, स्वतःची ओळख हवीय!”
लॅमिन यामल हा स्पेनमधील जगातील सर्वात नामांकित अशा ‘एफसी बार्सिलोना’ या क्लबकडून खेळतो. विशेष म्हणजे, याच बार्सिलोना क्लबकडून खेळताना एकेकाळी लिओनेल मेस्सीने फुटबॉल जगतावर वर्चस्व गाजवले होते. मेस्सीसोबत सतत होणाऱ्या तुलनेवर १८ वर्षांच्या यामलने अत्यंत प्रगल्भ विचार मांडले आहेत. तो म्हणाला, “मला कोणाचा तरी ‘पुढचा अवतार’ किंवा पुढचा मेस्सी बनायचे नाही. मला फुटबॉलच्या इतिहासात माझी स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करायची आहे. लहानपणापासून फिफा विश्वचषकात खेळण्याचे पाहिलेले स्वप्न आता पूर्ण होत आहे.”
पहिलाच फिफा वर्ल्डकप अन् दुखापतीचे सावट –
🚨🇪🇸 Lamine Yamal and his look-a-like wax figure at Madame Tussauds 😅#lamineyamal #spain #worldcup pic.twitter.com/fhJbGvl0Q2
— Football Fans Tribe 🇳🇬 ⚽ (@FansTribeHQ) June 9, 2026
१२ जूनपासून सुरू होणारा ‘फिफा विश्वचषक २०२६’ हा लॅमिन यामलच्या कारकिर्दीतील पहिलाच विश्वचषक असणार आहे. सध्या तो दुखापतीशी झगडत असला, तरी तो लवकर बरा व्हावा यासाठी जगभरातील फॅन्स प्रार्थना करत आहेत. यामलचा आत्मविश्वास कमालीचा असून तो म्हणतो, “फुटबॉल मैदानावर खेळून जिंकला जातो, कागदावरील आकडेवारीवर नाही. युरो कप २०२४ मध्ये आम्हाला कोणी प्रबळ दावेदार मानत नव्हते, पण आम्हीच चॅम्पियन ठरलो.”
युरो कपनंतर आता स्पेनची नजर थेट विश्वचषकावर!
२०२४ च्या युरो कपमध्ये स्पेनने इंग्लंडचा २-१ असा पराभव करून जेतेपद पटकावले होते. २०१० मध्ये पहिल्यांदा फिफा विश्वचषक जिंकणाऱ्या स्पेनला आता तब्बल १६ वर्षांनंतर दुसऱ्यांदा विश्वविजेतेपद मिळवण्याची सुवर्णसंधी आहे. या ऐतिहासिक मोहिमेत लॅमिन यामलची भूमिका अत्यंत निर्णायक ठरणार आहे.
१८ वर्षांच्या यामलची आकडेवारी भल्याभल्या फुटबॉलपटूंना थक्क करणारी आहे. त्याने बार्सिलोनासाठी आतापर्यंत १५१ अधिकृत सामने खेळले आहेत; ज्यातील १२३ सामन्यांत तो ‘स्टार्टिंग इलेव्हन’मध्ये होता. या काळात त्याने ४९ गोल डागले असून ४४ असिस्ट (गोलसाठी सहकाऱ्याला दिलेला पास) नोंदवले आहेत.





