IND vs NZ : चौथ्या टी-२० सामन्यात टीम इंडियात होणार बदल! वैभव सूर्यवंशीला प्लेइंग इलेव्हनमधून दिला जाणार डच्चू?
IND vs NZ : भारत न्यूझीलंडविरुद्ध टी-२० मालिकेतील चौथा सामना ऑकलंडमध्ये खेळणार आहे. त्या सामन्यापूर्वी इशान किशनने नेटमध्ये फलंदाजीचा सराव केला.

IND vs NZ 4th T20 Auckland Eden Park Preview : न्यूझीलंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत ३-० अशी विजयी व अजेय आघाडी घेतल्यानंतर भारतीय संघ आता ऑकलंडमध्ये दाखल झाला आहे. मालिकेतील चौथा सामना शुक्रवारी येथील प्रसिद्ध ईडन पार्क मैदानावर खेळवला जाणार आहे. वेलिंग्टनमध्ये तिसरा सामना जिंकल्यानंतर भारतीय संघाने गुरुवारी मैदानावर उतरून कसून सराव केला. मालिका आधीच खिशात असल्याने उर्वरित दोन सामन्यांमध्ये भारतीय संघ व्यवस्थापन आपल्या राखीव खेळाडूंना संधी देण्याच्या तयारीत आहे.
अभिषेक आणि तिलक वर्माचा दमदार फॉर्म; दुबे अजूनही बाहेर
सलामीवीर अभिषेक शर्मा आणि उपकर्णधार तिलक वर्मा सध्या तुफानी फॉर्ममध्ये आहेत. अभिषेकने तिसऱ्या सामन्यात ३५ चेंडूंत वादळी शतक झळकावले होते, तर तिलकने दुसऱ्या सामन्यात मॅचविनिंग अर्धशतक ठोकले होते. दुसरीकडे, भारताला विश्वविजेतेपद मिळवून देणारा अष्टपैलू शिवम दुबे मात्र अजूनही बेंचवरच आहे; कारण वेगवान गोलंदाज अष्टपैलू म्हणून नितीश कुमार रेड्डीला संघात प्राधान्य दिले जात असून त्याने उपयुक्त कामगिरी केली आहे.
इशान किशनचा नेट्समध्ये सराव; वैभव सूर्यवंशी बाहेर बसणार?
Shubman Gill with Ishan Kishan and Vaibhav Sooryavanshi in the practice session today at Auckland. ❤️
#ishankishan #shubmangill https://t.co/vzJJ2HZ0xh
— @steadymind (@VedPrak7771720) October 29, 2026
पहिल्या सामन्यात दुखापतग्रस्त झालेला यष्टिरक्षक इशान किशन ऑकलंड टी-२० पूर्वी नेट्समध्ये कसून फलंदाजीचा सराव करताना दिसला. तिसऱ्या सामन्यात सलामीला येत १९ चेंडूंत ४५ धावा कुटणाऱ्या १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीसाठी ही धोक्याची घंटा ठरू शकते. इशान किशन पूर्णपणे तंदुरुस्त होऊन संघात परतल्यास वैभवला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर बसावे लागण्याची दाट शक्यता आहे.
कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्तीला संधी मिळणार?
किवींच्या खेळपट्ट्यांवर वेगवान गोलंदाजांना अधिक मदत मिळत असल्याने भारताचे दोन्ही प्रमुख फिरकीपटू कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती यांना अजून एकही सामना खेळता आलेला नाही. दुखापतीनंतर संघात परतलेल्या वरुणसाठी ही पुनरागमनाची मालिका आहे. आता मालिका जिंकल्यामुळे कोणताही दबाव नसल्याने संघ या दोघांना प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देऊन आपली गोलंदाजी अजमावून पाहू शकतो.





