Pune District : पोटासाठी चिमुकलीची जीवघेणी कसरत
Pune District : तिच्या या थरारक कसरती पाहणार्यांच्या अंगावर शहारे आणतात; मात्र या कसरतीमागील तिच्या कुटुंबाची व्यथा मन हेलावून टाकणारी आहे.

आळेफाटा : टीचभर पोटासाठी एका चिमुकलीला तब्बल दहा फूट उंच तारेवर जीवावर बेतणार्या कसरती कराव्या लागत असल्याचे विदारक चित्र आळेफाटा परिसरात पाहायला मिळाले. तारेवर चालणे, तारेवर ताटली ठेवून त्यावरून तोल सांभाळत चालणे, डोक्यावर भांड्यांची उतरंड ठेवून कसरती करणे, असे धोकादायक खेळ ही चिमुकली सहजपणे करून दाखवते. तिच्या या थरारक कसरती पाहणार्यांच्या अंगावर शहारे आणतात; मात्र या कसरतीमागील तिच्या कुटुंबाची व्यथा मन हेलावून टाकणारी आहे.
छत्तीसगडहून पोटाची खळगी भरण्यासाठी महाराष्ट्रात आलेले हे कुटुंब गावोगावी फिरत कसरतीचे खेळ सादर करते. आई-वडिलांसोबत फिरणार्या या चिमुकलीच्या हातात वयाच्या मानाने खेळणी किंवा पुस्तकांऐवजी कसरतीची साधने आली आहेत. जमिनीवरून सुरू झालेली तिची कसरत आता थेट दहा फूट उंच तारेपर्यंत पोहोचली आहे. तारेवर चालताना किंचितसा तोल गेला तरी गंभीर दुर्घटना होण्याची शक्यता असते. तरीही प्रेक्षकांसमोर ही चिमुकली कोणतीही भीती न बाळगता कसरती सादर करते. तिच्या प्रत्येक पावलामागे प्रेक्षकांचे कुतूहल असले, तरी त्या प्रत्येक पावलामागे कुटुंबाची भूक आणि जगण्याची धडपड दडलेली आहे.
चौकशी केली असता चिमुकलीच्या आई-वडिलांनी आपल्या परिस्थितीची व्यथा सांगितली. जीवावर बेतणार्या कसरती करूनही पैसे मिळतीलच याची खात्री नसते. एखाद्या दिवशी खेळ दाखवूनही अपेक्षित पैसे मिळाले नाहीत, तर उपाशीपोटी झोपण्याची वेळ येते. आभाळाचे छत आणि जमिनीची गादी हेच त्यांच्या संसाराचे छत झाले आहे. कधी एखाद्या दानशूर व्यक्तीकडून 50 ते 60 रुपये मिळतात; मात्र तेही दररोज मिळतीलच याची शाश्वती नाही. आज एका गावात, उद्या दुसर्या गावात असा त्यांचा प्रवास सुरू असतो. भाकरीच्या दोन घासांसाठी सुरू असलेल्या या संघर्षात चिमुकलीला आपला जीव धोक्यात घालावा लागत आहे.
भुकेच्या दोन घासांसाठी जीवघेणी कसरत
पोटात पेटलेली भुकेची आग शांत करण्यासाठी एका लहान मुलीला दहा फूट उंच तारेवर चालावे लागते, हे वास्तव अस्वस्थ करणारे आहे. एकीकडे बालकांच्या शिक्षणाचा आणि सुरक्षित बालपणाचा जागर केला जात असताना दुसरीकडे या चिमुकलीसारख्या मुलांच्या वाट्याला जगण्यासाठी जीवघेणी कसरत येत आहे.





