Pune District : दुसऱ्या श्रावणी सोमवारी भीमाशंकर दुमदुमले
Pune District : पहाटे साडेतीनच्या सुमारास पोपटराव दसगुडे यांनी शिवलिंगावर अभिषेक केला. त्यानंतर मंदिर दर्शनासाठी खुले केले.

शिरूर : प्रभू श्री रामलिंग महाराज की जय आणि हर हर महादेव च्या गजराबरोबरच श्री शिवाय नमस्तुभ्यं आणि ओम नमः शिवाय चा जप करीत सोमवार (दि.२४) तालुक्यासह जिल्ह्याच्या विविध भागांतून हजारो शिवभक्तांची रामलिंग चरणी माथा टेकविण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. शिरूर शहर व पंचक्रोशीचे आराध्य दैवत असलेल्या श्री रामलिंग महाराजांच्या दर्शनासाठी दुसऱ्या श्रावणी सोमवारी गर्दीने उच्चांक मोडले.
शिरूर शहरापासून तीन किलोमीटरवर श्री रामलिंग मंदिर असून, खुद्द प्रभू श्री रामचंद्रांनी या मंदिरातील शिवलिंगाची प्रतिष्ठापना केल्याची आख्यायिका आहे. श्रीरामाच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या या पावन भुमीतील या देवस्थानचे महात्म्य अनेक पुराणांत व ग्रंथांमध्ये नमूद आहे. दरवर्षी श्रावण महिन्यात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असते. यावेळी श्रावणात पहिल्या श्रावणी सोमवारी होणाऱ्या गर्दीचा अंदाज लक्षात घेऊन श्री रामलिंग देवस्थान ट्रस्टच्या वतीने विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या.
यावेळी श्री रामलिंग देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष प्रकाश रसिकलाल धारिवाल यांनी मंदिरात येऊन पाहणी करून तयारीचा आढावा घेतला होता. तुळशीराम परदेशी, पोपटराव दसगुडे, रावसाहेब घावटे, वाल्मीकराव कुरंदळे, बलदेवसिंग परदेशी, नामदेवराव घावटे, जगन्नाथ पाचर्णे, बबनराव कर्डिले, आदित्य धारिवाल विश्वस्त उपस्थित होते.
पहाटे साडेतीनच्या सुमारास पोपटराव दसगुडे यांनी शिवलिंगावर अभिषेक केला. त्यानंतर मंदिर दर्शनासाठी खुले केले. सकाळी सर्व विश्वस्तांच्या उपस्थितीत महापूजा व महाआरती झाल्यानंतर शिवपिंडीवर मुखवटा घालून महावस्त्र परीधान करण्यात आले. पिंडीसह मुख्य गाभाऱ्यात सुगंधित व रंगीबेरंगी फुलांची आकर्षक सजावट केली होती. मंदिर परिसरात व शिखरावरही विद्युत रोषणाई केली होती. महिला भगिनींची दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती. दर्शनबारीमध्ये सत्तर टक्के महिलांचा सहभाग होता. अनेक महिलांनी शिवपिंडीवर बेलफूलाबरोबरच पेढे, लाह्यांचा प्रसाद अर्पण केला.
५० हजार भाविक लीन
दिवसभरात पन्नास हजाराहून अधिक भाविकांनी दर्शन घेतले असल्याची माहिती देवस्थान ट्रस्ट च्या वतीने देण्यात आली. सर्व भाविकांसाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच पावसाची शक्यता लक्षात घेऊन दर्शन बारीवर व मंदिर परिसरातील नंदीजवळ तात्पुरता मंडप उभारण्यात आला होता. मंदिर परिसरात व प्रवेशद्वाराजवळही फुलांची आकर्षक सजावट केली होती.





