Manchar : सह्याद्रीच्या रक्षणासाठी कुर्हाडबंदी सत्याग्रह
Manchar : या आंदोलनाच्या माध्यमातून सह्याद्री डोंगररांगांतील 23 प्रस्तावित प्रकल्प आणि भीमाशंकर परिसरातील पर्यटन प्रकल्प तातडीने रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.

मंचर : सह्याद्री पर्वतरांगांचे पर्यावरण संरक्षण, आदिवासींचे मूलभूत हक्क आणि स्थानिक नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांना न्याय मिळावा, या मागण्यांसाठी भीमाशंकर मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ 30 ऑक्टोबरपासून ‘कुर्हाडबंदी’ सत्याग्रहांतर्गत आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. सह्याद्री आणि भीमाशंकर परिसरातील विविध प्रश्न मार्गी लागेपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला आहे. या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी श्री क्षेत्र भीमाशंकर येथील व्यावसायिकांनी बुधवारी (दि. 4) आपली दुकाने बंद ठेवली.
या आंदोलनाच्या माध्यमातून सह्याद्री डोंगररांगांतील 23 प्रस्तावित प्रकल्प आणि भीमाशंकर परिसरातील पर्यटन प्रकल्प तातडीने रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. अनिल तिटकारे, नारायण हिले, सौरभ बांडे, शरद ठोकळ आणि विजयकुमार बांबळे हे आमरण उपोषणाला बसले आहेत. पश्चिम घाटातील पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रातील निर्बंध रद्द करून ग्रामसभा आणि आदिवासींच्या पूर्वसंमतीला प्राधान्य द्यावे, पेसा कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करावी, तसेच धरणक्षेत्रातील 100 टक्के पाणी स्थानिक आदिवासींना मिळावे, अशा मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत.
याशिवाय आदिवासींच्या वनउपजाला किमान आधारभूत किंमत लागू करावी, स्वतंत्र बाजार समित्या स्थापन कराव्यात, स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात, बेकायदा बांधकामांवर कारवाई करावी आणि कोंढवळ ते होडवडी रस्त्याचे रखडलेले काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणीही करण्यात आली आहे, अशी माहिती अॅड. भाऊराव कोरडे यांनी दिली.
भीमाशंकर विकास आराखड्यात स्थानिक दुकानदारांना प्राधान्य द्यावे, ग्रामपंचायतीच्या विकास निधीचा पारदर्शक विनियोग करावा आणि स्थानिकांच्या शाश्वत रोजगारासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशा मागण्यांचाही निवेदनात समावेश आहे. जल, जंगल आणि जमिनीवरील हक्कांसाठी सुरू केलेले हे आंदोलन मागण्या पूर्ण होईपर्यंत सुरूच राहील, असा इशारा आंदोलकांनी दिला आहे.





