Koyna Dongri Mahotsav 2026 : दौलतनगर मरळी येथे रंगणार कोयना दौलत डोंगरी महोत्सव; काय आहे खास आकर्षण?
Koyna Dongri Mahotsav 2026 : पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून साकारलेला 'कोयना दौलत डोंगरी महोत्सव' यंदा २ एप्रिलपासून मरळीत होणार आहे.
Koyna Dongri Mahotsav 2026 – राज्याचे पर्यटन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्ह्याचे पर्यटन वाढवण्याचे दृष्टीने सुरू केलेला कोयना दौलत डोंगरी महोत्सव यंदा दि. 2 एप्रिल ते 6 एप्रिल यादरम्यान दौलतनगर मरळी येथे आयोजित करण्यात आला आहे. या निमित्ताने विविध सांस्कृतिक पारंपारिक कला प्रदर्शने, कृषी प्रदर्शन, तसेच बोटिंग, पॅराग्लायडिंग,
वॉटर स्पोर्ट्स या साहसी क्रीडा प्रकारांचे सादरीकरण केले जाणार असून पर्यटकांना हा महोत्सव मोठी पर्वणी ठरणार आहे. यंदा या महोत्सवाचे दुसरे वर्ष आहे. महाराष्ट्र पर्यटन महामंडळ व सातारा जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने या कोयना डोंगरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 2 एप्रिल रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत या महोत्सवाचे उद्घाटन मर्दानी खेळांच्या प्रात्यक्षिकाने होणार आहे.
नाडे, ता. पाटण येथील शिवतीर्थ परिसरामध्ये मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके हा प्रमुख आकर्षणाचा विषय राहणार आहे. याशिवाय सकाळी 11 वाजता कृषी प्रदर्शन, पशुपक्षी महोत्सव, महिला बचत गटांचे स्टॉल्स व बोटिंग महोत्सवाचेही उद्घाटन केले जाणार आहे. साहसी क्रीडा प्रकारामध्ये पॅराग्लाइडिंग हा आकर्षणाचा विषय आहे. पर्यटकांसाठी बग्गी रायडींग कॅमल रायडींग तसेच लहान मुलांसाठी विविध खेळांचे आकर्षण राहणार असून त्यांच्यासाठी कोयना डोंगरी महोत्सवात अनेक मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
लोककलांचे समृद्ध दर्शन घडवणारे कार्यक्रम
महाराष्ट्राच्या लोककला परंपरा, खाद्य संस्कृती तसेच पर्यावरण समृद्धता याचे समृद्ध दर्शन घडवणारे अनेक कार्यक्रम या महोत्सवात सादर होतील. सर्व कार्यक्रम सायंकाळी सात वाजता महोत्सवात सादर केले जाणार असून दि. 2 एप्रिल रोजी पोवाडा सादरीकरण, दि. 3 एप्रिल रोजी विविध पथकांचे भजन,
दि. 4 एप्रिल रोजी सातारा जिल्ह्यातील ब्रास बँड पथकांच्यावतीने कला सादरीकरण तर दि. 5 एप्रिल रोजी एक दिवसीय लावणी महोत्सव आयोजित करण्यात आला असून महाराष्ट्रातील नामांकित नृत्यांगना आपली कला येथे सादर करणार आहेत. लावणी हा महाराष्ट्राच्या लोककलेचा प्रसिद्ध नृत्य प्रकार असून या लावणी महोत्सवाचा आनंद पर्यटकांसाठी विशेष आकर्षणाचा विषय आहे.
पर्यटकांना हा महोत्सव नक्की आवडेल – ना. शंभूराज देसाई
दिनांक 6 एप्रिल रोजी मराठी येथील लोकनेते बाळासाहेब देसाई कारखाना प्रवेशद्वार हे शताब्दी स्मारक यादरम्यान भव्य कार्निव्हल आयोजित करण्यात आले आहे. सायंकाळी सात वाजता विविध सांस्कृतिक कार्यक्रम तसेच हिंदी मराठी गाण्यांची प्रसिद्ध कलाकारांच्या माध्यमातून नजाकत पेश केली जाणार असून पर्यटकांना हा महोत्सव नक्की आवडेल असा विश्वास राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केला आहे.






