Shambhuraj Desai: भाजपला धक्का देत शंभूराज देसाईंनी मैदान मारलं! सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेची बाजी
Shambhuraj Desai: पाटणमधील राजकीय संघर्षाला नवे वळण

Shambhuraj Desai: अहिल्यानगर, सातारा आणि सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या संचालक मंडळाच्या निवडणूक निकालाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. याचदरम्यान साताऱ्यात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनाला पहिला मोठा विजय मिळाला आहे.
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत पाटण विकास सेवा सोसायटी मतदारसंघात चुरशीचा सामना होता. या अटीतटीच्या सामन्यात साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी बाजी मारली आहे.
भाजपला मोठा धक्का
पाटण विकास सेवा सोसायटी मतदारसंघातून पालकमंत्री शंभूराज देसाई विजयी झाले आहेत. त्यांनी पारंपारिक प्रतिस्पर्धी भाजपचे सत्यजितसिंह पाटणकर यांचा पराभव केला.
या निवडणुकीत दोन्ही दिग्गजांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या या गटात शंभूराज देसाई यांनी ५८ मते मिळवून दणदणीत विजय मिळवला. सातारा पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या विजयानंतर मतदान केंद्राबाहेर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.
‘शंभूराज देसाई साहेब पुढे चला’ अशा घोषणा देत, गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी आणि पेढे भरवून कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला.
सत्यजितसिंह पाटणकरांचा पराभव
विशेष म्हणजे, तब्बल ४२ वर्षांनंतर पाटणमध्ये देसाई गटाने जिल्हा बँकेच्या निवडणुकीत यश मिळवल्याने या निकालाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.या विजयामुळे भाजपच्या सत्यजितसिंह पाटणकर गटाला मोठा राजकीय धक्का बसला आहे. अवघ्या एका तासात पाटण सोसायटी मतदारसंघाचा निकाल समोर आला. या निवडणुकीत एकूण १०३ ठरावांपैकी ५८ ठराव देसाई यांच्या बाजूने झाल्याने त्यांची सरशी निश्चित झाली.
पाटण सोसायटी मतदारसंघातील या विजयामुळे सातारा जिल्हा बँकेतील शंभूराज देसाई गटाची ताकद वाढण्याची शक्यता आहे. याशिवाय जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत आणि सहकारी संस्थांमधील राजकीय समीकरणांवरही याचा परिणाम होऊ शकतो.
हेही वाचा:





