Shambhuraj Desai : ‘500 कोटींच्या आरोपाची फॉरेन्सिक चौकशी करा’; मंत्री शंभूराज देसाई यांची मागणी
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाखाली ५०० कोटी रुपये घेतल्याच्या मनोज जरांगे यांच्या आरोपावरून राज्यातील राजकीय वातावरण तापले असताना, सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पर्यटनमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी आक्रमक भूमिका मांडली.

Shambhuraj Desai : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाखाली ५०० कोटी रुपये घेतल्याच्या मनोज जरांगे यांच्या आरोपावरून राज्यातील राजकीय वातावरण तापले असताना, सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पर्यटनमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी आक्रमक भूमिका मांडली.
‘ग्रुप कॉलवरील आवाज कोणाचा, संभाषणात नेमके काय बोलले गेले आणि त्यामागचा उद्देश काय, हे फॉरेन्सिक तपासणीतून स्पष्ट झाले पाहिजे. वस्तुनिष्ठ चौकशी होण्यापूर्वी आरोपांत तथ्य शोधण्याची घाई करू नये,’ अशी मागणी त्यांनी केली. पुराव्यांशिवाय एकनाथ शिंदे यांच्यावर बेछूट आरोप करून त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न करू नये, असेही त्यांनी साताऱ्यात प्रसार माध्यमांशी (Shambhuraj Desai) बोलताना ठणकावले.
पत्रकार परिषदेत बोलताना देसाई म्हणाले, ‘मी कोणाकडून पैसे घेतले नाहीत आणि कोणाला दिलेही नाहीत,’ अशी स्पष्ट भूमिका एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्याची त्यांची तयारी आहे. त्यामुळे या प्रकरणाची पोलीस महासंचालकांमार्फत सखोल चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे. ग्रुप कॉलमधील आवाजाची फॉरेन्सिक तपासणी करून बोलणारी व्यक्ती कोण आहे, हे निश्चित झाले पाहिजे. चौकशीअंतीच या आरोपांचे वास्तव स्पष्ट होईल.
‘सहा महिन्यांत असे काय घडले?’
२०२२ ते २०२४ या काळात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मनोज जरांगे यांच्याशी झालेल्या चर्चांचा मी साक्षीदार आहे. त्या वेळी जरांगे यांनी शिंदे यांच्या कामाचे कौतुक केले होते. ‘शेतकऱ्याचा मुलगा असून सर्वसामान्यांच्या प्रश्नांची त्यांना जाण आहे,’ असेही ते म्हणाले होते. मग गेल्या सहा महिन्यांत असे नेमके काय घडले की जरांगे आता शिंदे यांच्यावर टीका करीत आहेत, असा सवाल देसाई यांनी उपस्थित केला.
स्थानिक नेत्यांविषयी जरांगे यांची नाराजी होती. संबंधित स्थानिक आमदारांनी काही चुकीचे केले असल्यास त्यांना समज देण्याची भूमिका शिंदे यांनी घेतली होती. मात्र, स्थानिक नेत्यांवरील नाराजीचा रोष थेट शिंदे यांच्यावर काढणे योग्य नाही. कार्यकर्त्यांची चूक असल्यास ती जरूर दाखवून द्या; पण त्यासाठी शिंदे यांना लक्ष्य करू नका, असे आवाहन देसाई यांनी केले.
‘शिंदे कालही मराठा समाजासोबत होते आणि भविष्यातही राहतील. त्यांनी मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिले आणि ते टिकवलेही. आम्ही मराठा समाजाचेच आहोत आणि सत्तेचा वापर समाजाच्या हितासाठी केला आहे,’ असे सांगत त्यांनी आरोपांमागील सत्य तपासातूनच समोर आणण्याची मागणी केली.
जिल्हा बँकेत महायुतीचे जागावाटप
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीबाबत देसाई म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या सूचनेनुसार जिल्हास्तरावरील दहा जागा महायुती म्हणून एकत्र लढविण्याचा निर्णय झाला. त्यात भाजपला पाच, राष्ट्रवादी काँग्रेसला तीन आणि शिवसेनेला दोन जागा देण्यात आल्या आहेत. सोसायटी मतदारसंघातील तालुकानिहाय जागा स्वतंत्रपणे लढविण्याचे नियोजन आधीपासूनच होते.
वाई, सातारा आणि खटाव येथील तीन जागा बिनविरोध झाल्या असून उर्वरित आठ जागांसाठी निवडणूक होणार आहे. पाटण तालुक्यातही आम्ही गांभीर्याने प्रयत्न करीत असून जनतेचा पाठिंबा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शिक्षक-पदवीधर मतदारसंघाची निवडणूक झाल्यानंतर मतदारांच्या गाठीभेटींना सुरुवात करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. शिवसेनेच्या मंगलताई पाटील बिनविरोध निवडून आल्याने निवडणुकीची सुरुवात चांगली झाल्याचे समाधानही त्यांनी (Shambhuraj Desai) व्यक्त केले.






