Shambhuraj Desai : महाराष्ट्रात पहिल्यांदाच होणार ‘हनी बी टूरिझम’; पर्यटन मंत्री शंभूराज देसाईंनी दिली माहिती

कोयनानगर : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे (एमटीडीसी) महाबळेश्वर येथे २ ते ४ मे दरम्यान आयोजित महापर्यटन महोत्सवात राज्यात प्रथमच ‘हनी बी पर्यटन’ या नाविन्यपूर्ण संकल्पनेवर आधारित पर्यटन सहलीचे आयोजन करण्यात येत आहे.
पर्यटनमंत्री शंभूराज देसाई म्हणाले, “मधमाशी पालन हा पर्यावरणपूरक, आर्थिकदृष्ट्या लाभदायक आणि ग्रामीण रोजगाराला चालना देणारा व्यवसाय आहे. पर्यटकांना याची माहिती आणि अनुभव मिळावा, यासाठी ‘हनी बी टूर’ आयोजित करण्यात येत आहे.”
सहलीचे दोन टप्पे:
महाबळेश्वर मध संचालनालय:
येथे पर्यटकांना आधुनिक मधमाशी पालनाची माहिती मिळेल. प्रमुख आकर्षणे:
हनी पार्क: मधमाश्यांचे जीवनचक्र, जाती, मधपेट्या व उपकरणांची ओळख.
मधुबन: मधमाश्या, पोळे, राणीमाशी पाहण्याची संधी.
“I Love Madhuban” सेल्फी पॉइंट.
संग्रहालय: मध निर्मिती प्रक्रिया आणि वैज्ञानिक माहिती.
प्रक्रिया युनिट: मध शुद्धीकरण, बॉटलिंग, लेबलिंग प्रात्यक्षिक.
प्रयोगशाळा: मध गुणवत्ता तपासणी व वनस्पती ओळख.
व्याख्यान सत्र: उद्योग सुरू करण्यासाठी मार्गदर्शन आणि पुस्तिका.
खरेदी केंद्र: “मधुबन” सेंद्रिय मध उपलब्ध.
मधाचे गाव मांघर (महाबळेश्वरपासून ९ किमी):
गावाच्या प्रवेशद्वारावर “मधाचे गाव मांघर” कमान पर्यटकांचे स्वागत करते.
वैशिष्ट्ये: स्थानिक शेतकऱ्यांनी स्थापलेल्या मधपेट्या.
नॉर्थकोर्ट पॉइंट: मकरंदगड, प्रतापगड, कोयनानदीचा उगम आणि सह्याद्रीच्या रांगा.
माहिती व प्रशिक्षण केंद्र: जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून उभारलेले केंद्र, माहिती फलक व साहित्य.
नोंदणी आवश्यक:
सहलीसाठी एमटीडीसीच्या संकेतस्थळावर पूर्वनोंदणी बंधनकारक आहे. प्रत्येक टूरसाठी शुल्क आणि वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे.
पर्यावरण आणि ग्रामीण विकासाला चालना:
या उपक्रमातून पर्यटकांना मधमाशी पालनाचा अनुभव मिळेल, तसेच स्थानिकांना रोजगार, शिक्षण आणि पर्यावरण संवर्धनाची संधी मिळेल. हा उपक्रम राज्याच्या पर्यावरणपूरक पर्यटन धोरणाला चालना देणारा ठरेल, असे पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.





