Sangli Satara MLC Election: महायुती की महाविकास आघाडी? सांगली-सातारा विधान परिषदेसाठी आज मतदान
Sangli Satara MLC Election: सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी आज मतदान; महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये थेट सामना.

Sangli Satara MLC Election – विधान परिषदेच्या सातारा- सांगली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उद्या (दि. १८) मतदान होणार असून जिल्हाभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे ४७२ लोकप्रतिनिधी मतदान प्रक्रियेत सहभागी होणार आहेत. मतदानासाठी सातारा जिल्ह्यात सात तालुक्यांमध्ये केंद्रांची उभारणी करण्यात आली असून प्रशासनाने सर्व यंत्रणा सज्ज ठेवली आहे. या निवडणुकीत नगरपालिका, नगरपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेतील निवडून आलेले सदस्य मतदार म्हणून मतदानाचा अधिकार बजावणार आहेत.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संबंधित तहसील कार्यालयांमध्ये मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली असून सुरक्षा, साहित्य वितरण आणि कर्मचारी नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. वाई येथील केंद्रावर वाई, महाबळेश्वर आणि पाचगणी नगरपालिका तसेच खंडाळा व लोणंद नगरपंचायतीतील सदस्य मतदान करणार आहेत. फलटण येथे फलटण नगरपालिकेचे सदस्य मतदानासाठी पात्र आहेत. माण तालुक्यातील केंद्रावर दहिवडी, वडूज आणि म्हसवड नगरपंचायतींचे प्रतिनिधी मतदान करतील.
याशिवाय सातारा, कराड, पाटण आणि कोरेगाव तालुक्यांतील मतदान केंद्रांवर संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांचे सदस्य आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदानाची प्रक्रिया सकाळपासून सुरू होणार असून सर्व केंद्रांवर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. दरम्यान, प्रचाराची मुदत संपत आल्याने उमेदवारांनी मतदारांशी संपर्क मोहिमेचा वेग वाढवला आहे. महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही बाजूंनी विजयासाठी जोरदार प्रयत्न सुरु असून निवडणुकीच्या निकालाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. उद्याच्या मतदानानंतर मतमोजणी होणार असून या निवडणुकीत कोण बाजी मारणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.





