Korea Masters 2024 (Badminton) : कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या किरण जॉर्जने पुन्हा एकदा चमकदार कामगिरी केली आहे. त्याने गुरुवारी इक्सान सिटी (कोरिया) येथे चायनीज तैपेईच्या तिसऱ्या मानांकित ‘ची यू जेन’चा (Chi Yu Jen) तीन गेममध्ये पराभव करून पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत (Quarter-final) प्रवेश केला आहे.
भारताच्या चोवीस वर्षीय किरणने दुसऱ्या फेरीच्या सामन्यात चायनीज तैपेईच्या जागतिक क्रमवारीत 31व्या क्रमांकाच्या खेळाडूचा 21-17, 19-21, 21-17 असा पराभव केला. हा (Kiran George vs Chi Yu Jen) सामना जवळपास एक तास 15 मिनिटं चालला.
त्यानंतर आता जागतिक क्रमवारीत 44व्या स्थानी असलेल्या किरणचा (Kiran George) उपांत्यपूर्व फेरीचा सामना पाचव्या मानांकित जपानच्या ताकुमा ओबायाशी (T. Obayashi) विरूध्द होईल. हा सामना शुक्रवारी (दि.8 नोव्हेंबर) भारतीय वेळेनुसार पहाटे 6.30 वाजल्यापासून सुरू होईल. किरणने याआधीच्या BWF सुपर 300 स्पर्धेच्या पहिल्या फेरीत व्हिएतनामच्या क्वान लिन कुओचा 15-21, 21-12, 21-15 असा पराभव केला होता.
Korea Masters 2024 (Badminton) : किरण जॉर्ज दुसऱ्या फेरीत दाखल….
या स्पर्धेत सहभागी झालेल्या एकमेव भारतीय खेळाडू किरणने सामन्यात चांगली सुरुवात केली आणि चायनीज तैपेईच्या खेळाडूविरुद्ध आघाडी कायम राखत पहिला गेम जिंकला. दुसऱ्या गेममध्येही किरणने चांगली सुरुवात करत आघाडी घेतली पण जेनने पुनरागमन करत स्कोअर 1-1 असा केला. तिसऱ्या आणि निर्णायक गेममध्ये किरणने 8-2 अशी भक्कम आघाडी घेतली पण जेनने 14-14 आणि नंतर 17-17 अशी बरोबरी साधली. मात्र, यानंतरही भारतीय खेळाडूने संयम राखून खेळ केला आणि सामना जिंकला.