Korea Masters 2024 (Badminton) :- भारताच्या किरण जॉर्जने बुधवारी चुरशीच्या लढतीत व्हिएतनामच्या क्वान लिन कुओचा तीन सेटसमध्ये पराभव करताना कोरिया मास्टर्स बँडमिंटन स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.
भारताच्या 24 वर्षीय किरणने 57 मिनिटांच्या लढतीत क्वान लिनला 15-21, 21-12, 21-15 असे पराभूत केले. किरण समोर दुसऱ्या फेरीत तिसरा मानांकित चायनीज तैपेईच्या ची यू जेनचे आव्हान असणार आहे. पहिल्या सेट गमावल्यानंतर किरणने दमदार खेळ करताना विजय खेचून आणला.
किरणने सामन्याची संथ सुरुवात केली, त्याचा फायदा घेत किन कुओने 11-4 अशी आघाडी घेतली आणि पहिला गेम सहज जिंकला. 0-1 ने पिछाडीवर पडल्यानंतर किरणने सलग सहा गुणांसह दुसरा गेम सुरू केला आणि त्यानंतर दुसरा गेम जिंकून सामना 1-1 असा बरोबरीत आणला. भारतीय खेळाडूने तिस-या आणि निर्णायक गेममध्ये आपली विजयी घोडदौड कायम ठेवली आणि एका तासापेक्षा कमी कालावधीत सामना जिंकला.