IPL 2026 साठी KKR चा मास्टरस्ट्रोक! CSK आणि RR च्या दिग्गजावर सोपवली मोठी जबाबदारी

Shane Watson KKR New Assistant Coach for IPL 2026 : आयपीएल २०२६ च्या लिलाव आणि रिटेन्शन विंडोपूर्वी सर्व फ्रँचायझी स्वतःला मजबूत करण्याच्या प्रयत्नात आहेत. याच पार्श्वभूमीवर, तीन वेळा आयपीएल विजेत्या कोलकाता नाईट रायडर्स (KKR) संघाने आपल्या कोचिंग स्टाफमध्ये मोठा आणि महत्त्वाचा बदल केला आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज अष्टपैलू खेळाडू शेन वॉटसनची केकेआरच्या सहाय्यक प्रशिक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. २०२४ मध्ये आयपीएलचे विजेतेपद पटकावणाऱ्या कोलकाता संघाने गुरुवार, १३ नोव्हेंबर रोजी वॉटसनच्या नियुक्तीची घोषणा केली.
केकेआर फ्रँचायझीने वॉटसनवर व्यक्त केला विश्वास –
शेन वॉटसनचे कोलकाता नाईट रायडर्समध्ये स्वागत करताना फ्रँचायझीचे सीईओ वेंकी म्हैसूर म्हणाले, “ऑस्ट्रेलियन दिग्गजाकडे असलेला खेळाडू आणि प्रशिक्षक म्हणून टी-२० क्रिकेटचा अफाट अनुभव आणि ज्ञान कोलकाता संघासाठी खूप उपयुक्त ठरेल.” या भूमिकेबद्दल उत्साह व्यक्त करताना वॉटसन म्हणाला की, केकेआरच्या कोचिंग स्टाफसोबत काम करण्यासाठी तो उत्सुक आहे आणि फ्रँचायझीला चौथ्यांदा आयपीएलचे विजेतेपद मिळवून देण्याचा त्याचा निर्धार आहे.
Eden Gardens, get ready to welcome your assistant coach @ShaneRWatson33 🫡🏟@VenkyMysore 🎙️ pic.twitter.com/pOZAT7ds53
— KolkataKnightRiders (@KKRiders) November 13, 2025
वॉटसनची आयपीएलमधील कामगिरी –
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी परदेशी खेळाडूंपैकी शेन वॉटसन एक आहे. २००८ मध्ये त्याने राजस्थान रॉयल्सला पहिले विजेतेपद मिळवून देण्यात मोठी भूमिका बजावली होती. त्याला ‘प्लेयर ऑफ द टूर्नामेंट’ म्हणून गौरवण्यात आले होते. त्याने आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळींपैकी एक २०१५ मध्ये कोलकाताविरुद्ध खेळली होती, ज्यात त्याने १०४ धावांची तुफानी खेळी केली होती. शेन वॉटसनने २०१८ मध्ये चेन्नई सुपर किंग्स (CSK) सोबत जोडले जाऊन पहिल्याच हंगामात ५५५ धावा करत संघाला चॅम्पियन बनवले होते. त्याने आयपीएलमध्ये १४५ सामन्यांमध्ये ३८७४ धावा केल्या असून ९२ विकेट्स देखील घेतल्या आहेत.
हेही वाचा – Rohit Sharma : बीसीसीआयच्या निर्देशानंतर हिटमॅन विजय हजारे ट्रॉफीत खेळणार की नाही? MCA चा धक्कादायक खुलासा!
कोचिंग स्टाफमध्ये महत्त्वाचे बदल –
शेन वॉटसन हा केकेआरच्या कोचिंग स्टाफमध्ये सामील होणारा दुसरा महत्त्वाचा चेहरा आहे. काही दिवसांपूर्वीच अभिषेक नायरची हेड कोच म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. नायर यांनी चंद्रकांत पंडित यांची जागा घेतली, ज्यांनी मागील हंगामानंतर राजीनामा दिला होता. नायर यापूर्वी पंडित यांच्यासोबत केकेआरमध्ये सहाय्यक प्रशिक्षक होते, त्यानंतर ते टीम इंडियाच्या सहाय्यक प्रशिक्षकपदी गेले होते. आता वॉटसनच्या अनुभवामुळे केकेआरचा युवा संघाला अधिक मजबूत होण्यास मदत मिळेल, अशी अपेक्षा आहे.





