प्योंगयोंग, (उत्तर कोरिया) – उत्तर कोरियाचे नेते किम जोंग-उन यांनी युक्रेनविरुद्धच्या युद्धात रशियाला बिनशर्त पाठिंबा देण्याचे वचन दिले आहे. प्योंगयांगमध्ये रशियाच्या सुरक्षा परिषदेचे सचिव सर्गेई शोइगु यांच्याशी झालेल्या भेटीदरम्यान किम यांनी हे विधान केले. उत्तर कोरिया आणि रशियामधील लष्करी सहकार्य वाढत असताना रशियाचे सर्वोच्च सुरक्षा अधिकारी शोइगु काल उत्तर कोरियात पोहोचले. बैठकीदरम्यान, किम यांनी युक्रेनच्या मुद्द्यासह सर्व महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय राजकीय मुद्द्यांमध्ये उत्तर कोरिया रशियाच्या भूमिकेला आणि त्याच्या परराष्ट्र धोरणांना बिनशर्त पाठिंबा देईल असे प्रतिपादन केले. गेल्या वर्षी जूनमध्ये प्योंगयांगमध्ये त्यांनी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी स्वाक्षरी केलेल्या व्यापक धोरणात्मक भागीदारी कराराचा संदर्भ देत, त्यांचा देश दोन्ही राष्ट्रांमधील कराराच्या कलमांचे जबाबदारीने पालन करेल असेही किम यांनी सांगितले. चर्चेदरम्यान, दोन्ही बाजूंनी युक्रेनच्या परिस्थितीवर दोन्ही राष्ट्रांच्या भूमिकेवर एकमत झाल्याची पुष्टी केली आणि द्विपक्षीय संबंधांना शक्तिशाली आणि व्यापक धोरणात्मक भागीदारी संबंधांमध्ये विकसित करण्याचे वचन दिले.