Suryakumar Yadav : सूर्यकुमारवर आरोप करणं खुशी मुखर्जीला पडलं महागात! पब्लिसिटी स्टंटमुळे अडचणीत; काय आहे प्रकरण?

Suryakumar Yadav 100 Crore Defamation Case : भारतीय टी-२० क्रिकेट संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याच्याबद्दल वादग्रस्त विधान करणे अभिनेत्री खुशी मुखर्जी हिला महागात पडले आहे. सोशल मीडिया इन्फ्लुएंसर फैजान अन्सारी याने खुशी मुखर्जीच्या विरोधात १०० कोटी रुपयांचा मानहानीचा खटला दाखल केला आहे. सूर्यकुमार यादवला तिने पाठवलेल्या कथित मेसेजेसवरून हा सर्व वाद सुरू झाला आहे.
नेमका वाद काय?
काही दिवसांपूर्वी खुशी मुखर्जीने एका मुलाखतीत असा दावा केला होता की, सूर्यकुमार यादव तिला खूप मेसेजेस करायचा. अनेक क्रिकेटपटू माझ्या मागे होते, असेही ती म्हणाली होती. मात्र, तिने हेदेखील स्पष्ट केले होते की त्यांच्यात कोणतेही रोमँटिक नाते नव्हते. तरीही, भारतीय कर्णधाराचे नाव अशा प्रकारे घेतल्याने क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरू झाली होती.
फैजान अन्सारीचा आक्रमक पवित्रा –
मुंबईकर असलेल्या फैजान अन्सारीने हा दावा खोटा असल्याचे सांगत गाझीपूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. खुशी मुखर्जीने केवळ प्रसिद्धी (पब्लिसिटी) मिळवण्यासाठी एका राष्ट्रीय खेळाडूची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप फैजानने केला आहे.
फैजान अन्सारी काय म्हणाला?
फैजान अन्सारी म्हणाला, “सूर्यकुमार यादवच्या प्रतिष्ठेला धक्का लावणाऱ्या या विधानांमुळे मी १०० कोटींचा मानहानीचा खटला दाखल केला आहे. खुशी मुखर्जीवर एफआयआर (FIR) दाखल होऊन तिला किमान ७ वर्षांची जेल व्हावी, अशी माझी मागणी आहे. इंस्टाग्रामवर मला २० लाखांहून अधिक लोक फॉलो करतात. जगासमोर सत्य आणणे ही माझी जबाबदारी आहे. जर खुशी तिचे आरोप सिद्ध करू शकली, तर मी सार्वजनिक माफी मागेन.”
हेही वाचा – UPW vs MI : हरलीन देओलचं वादळ! यूपी वॉरियर्सचा मुंबईवर दणदणीत विजय; सलग ३ पराभवांनंतर उघडलं विजयाचं खातं
कायदेशीर कारवाईचा इशारा –
फैजानने सांगितले की, त्याची कायदेशीर टीम अत्यंत मजबूत असून याआधी त्यांनी पूनम पांडेवरही १०० कोटींचा खटला भरला होता. सूर्यकुमार यादवच्या समर्थनार्थ देशातील प्रत्येक नागरिकाने पुढे यायला हवे, असे आवाहनही त्याने केले आहे. ही केवळ एका खेळाडूची बदनामी नसून एका राष्ट्रीय आयकॉनला टार्गेट करण्याचा कट असल्याचे त्याने म्हटले आहे.





