Vijay Hazare Trophy : विदर्भाची ऐतिहासिक झेप! गतविजेत्या कर्नाटकला धूळ चारत फायनलमध्ये धडक; मोखाडेने झळकावले शतक

Vidarbha reach final in Vijay Hazare Trophy 2026 : विजय हजारे ट्रॉफी २०२५-२६ च्या पहिल्या उपांत्य सामन्यात विदर्भाने बलाढ्य कर्नाटकचा ६ विकेट्सनी पराभव करत दिमाखात अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. बंगळुरू येथील बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्स मैदानावर झालेल्या या सामन्यात विदर्भाने गतविजेत्या कर्नाटकचे आव्हान संपुष्टात आणले. या विजयाचा खरा शिल्पकार ठरला तो म्हणजे फॉर्मात असलेला शतकवीर अमन मोखाडे.
कर्नाटकची फलंदाजी गडगडली; दर्शन नलकांडेचा ‘फायफर’
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा कर्नाटकचा निर्णय सुरुवातीलाच अंगलट आला. मयंक अग्रवाल आणि देवदत्त पडिक्कल हे अनुभवी सलामीवीर स्वस्तात बाद झाले. मात्र, करुण नायर (७६) आणि कृष्णन श्रीजित (५४) यांनी डावाला सावरले. तरीही विदर्भाच्या दर्शन नलकांडेने अचूक मारा करत ५ गडी बाद केले आणि कर्नाटकचा डाव २८० धावांवर रोखला.
Through to the final! 👏
Vidarbha with a six-wicket victory against Karnataka in the first semi-final 👌#VijayHazareTrophy | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/gQOhUSbb77
— BCCI Domestic (@BCCIdomestic) January 15, 2026
अमन मोखाडेचा ‘विराट’ अवतार; यंदाच्या हंगामातील ५ वे शतक
२८१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना अमन मोखाडेने कर्नाटकच्या गोलंदाजांची पिसे काढली. अमनने १२२ चेंडूत १३८ धावांची तुफानी शतकीय खेळी साकारली. या स्पर्धेतील अमनचे हे पाचवे शतक आहे, जे त्याच्या जबरदस्त फॉर्मची साक्ष देते. त्याला रविकुमार समर्थने (नाबाद ७६) मोलाची साथ दिली. या दोघांच्या भागीदारीमुळे विदर्भाने ३ गडी गमावून ४६.२ षटकांतच विजय मिळवला.
विदर्भाची अमन मोखाडेवर मदार –
A 5⃣th 💯 this season 🔥
Watch 📹 snippets of Aman Mokhade’s solid century in the semis against Karnataka 💪
Scorecard ▶️ https://t.co/jfwhfewAsV#VijayHazareTrophy | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/kULAinqwiQ
— BCCI Domestic (@BCCIdomestic) January 15, 2026
अमन मोखाडेसाठी हा हंगाम स्वप्नवत ठरला आहे. त्याने ९ सामन्यांत ५ शतके आणि १ अर्धशतक झळकावून विदर्भाला अंतिम फेरीपर्यंत पोहोचवण्यात मोलाचा वाटा उचलला आहे. आता जेतेपदासाठी विदर्भाला केवळ एका विजयाची गरज आहे.
आता विदर्भाचा पुढचा सामना अंतिम फेरीत सौराष्ट्र किंवा पंजाब यांच्यातील विजेत्याशी होईल. या दोन संघांमधील दुसरा उपांत्य सामना १६ जानेवारीला खेळवला जाणार आहे. या सामन्यातील विजेत्याशी अंतिम सामन्यात विदर्भ भिडेल.





