Khed Panchayat Samiti: राष्ट्रवादीने शेवटच्या क्षणी माघार का घेतली? खेड पंचायत समिती निवडणुकीत मोठा राजकीय ट्विस्ट
Khed Panchayat Samiti: खेड पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती निवडणुकीत उबाठा शिवसेनेचा दणदणीत विजय; राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी अर्ज घेतले मागे.

Khed Panchayat Samiti- खेड पंचायत समितीच्या सभापतीपदी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या कु. गौरी चंदन मुर्हे, तर उपसभापतीपदी दिलीप डुबे यांची बिनविरोध निवड झाली. सभापती विद्या मोहिते आणि उपसभापती मंगेश सावंत यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर सोमवारी (दि. 5) ही निवडणूक घेण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अनिल दौंडे यांच्या अधिपत्याखाली खेड पंचायत समितीच्या राजा शिवछत्रपती सभागृहात निवडणूक प्रक्रिया पार पडली.
सभापतीपदासाठी उबाठा शिवसेनेच्या गौरी मुर्हे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्या अर्जाला ज्ञानेश्वर ढेरंगे सूचक होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या श्रद्धा मांडेकर यांनीही सभापतीपदासाठी अर्ज दाखल केला असून, त्यांच्या अर्जाला अश्विनी तरस सूचक होत्या. उपसभापतीपदासाठी उबाठा शिवसेनेचे दिलीप डुबे यांनी अर्ज दाखल केला. त्यांच्या अर्जाला मंगेश सावंत सूचक होते.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून दिनेश हांडे यांनी अर्ज दाखल केला असून, त्यांच्या अर्जाला निखिल थोरवे सूचक होते. सभापतीपदाच्या उमेदवार श्रद्धा मांडेकर आणि उपसभापतीपदाचे उमेदवार दिनेश हांडे यांनी माघार घेतल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी अनिल दौंडे यांनी गौरी मुर्हे यांची सभापतीपदी, तर दिलीप डुबे यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.
यावेळी पंचायत समिती सदस्या रूपाली कांबळे, माऊली ढेरंगे, प्रसाद घेनंद, शंकर कावडे उपस्थित होते. निवडीनंतर नवनिर्वाचित सभापती गौरी मुर्हे आणि उपसभापती दिलीप डुबे यांचा आमदार बाबाजी काळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद गटनेते अॅड. विजयसिंह शिंदे, गणेश अरगडे, सदस्य दीप्ती भोगाडे, तनुजा घनवट, विनया मुंगसे,
शिवसेनेच्या जिल्हा संघटक विजया शिंदे, जिल्हाप्रमुख रामदास धनवटे, उपजिल्हाप्रमुख शिवाजी वर्पे, तालुकाप्रमुख किरण गवारे, बाजार समितीचे सभापती अशोक राक्षे, माजी उपसभापती क्रांती सोमवंशी, संचालक सयाजी मोहिते, सोमनाथ मुंगसे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. अॅड. विजयसिं शिंदे, रामदास धनवटे, नवनिर्वाचित उपसभापती दिलीप डुबे यांच्यासह अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.
“सभापती, उपसभापती म्हणून आम्हाला काम करण्याची संधी मिळाली आहे. या संधीचे आम्ही निश्चितपणे सोने करू. खेड तालुक्याच्या पंचायत समितीला देदिप्यमान आणि वैभवशाली इतिहास लाभला आहे. या वैभवात अधिक भर घालण्याचा प्रयत्न करू. तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न आणि समस्या सोडविण्यास प्राधान्य देऊ. सभापतीपदाची प्रतिष्ठा वाढविण्यासाठी प्रयत्न करू.”
– गौरी मुर्हे, नवनिर्वाचित सभापती
“स्व. माजी आमदार सुरेश गोरे यांनी पाहिलेले पंचायत समितीच्या इमारतीचे स्वप्न आता पूर्णत्वाकडे जात आहे. पक्षाच्या माध्यमातून पुढील काळात इतर सदस्यांनाही पदाची संधी दिली जाईल. एका शिवसैनिकाच्या मुलीला पंचायत समिती सदस्य होता आले आणि आज शिवसेनेच्या कन्या गौरीताईंना सभापतीपदाच्या खुर्चीवर बसण्याचा मान मिळाला, ही अभिमानाची गोष्ट आहे. गौरीताई आपल्या पदाला शोभेल असे कामकाज करतील.”
– बाबाजी काळे, आमदार खेड-आळंदी






