Khed News – खेड तालुक्यात आरटीई (राईट टू एज्युकेशन) अंतर्गत खासगी इंग्रजी माध्यम शाळांमधील प्रवेश प्रक्रियेत मोठ्या भ्रष्टाचाराच्या चर्चा रंगल्या आहेत. कमी उत्पन्न गटातील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्यासाठी असलेल्या या योजनेत एका प्रवेशासाठी 50 हजार ते 1 लाख रुपये घेतल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी जिल्हा परिषद विरोधी पक्ष गटनेते अॅड. विजयसिंह शिंदे पाटील यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत केली असून, जिल्हा परिषद उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनी तत्काळ चौकशीचे आदेश दिले आहेत. शासनाच्या धोरणानुसार इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत खासगी इंग्रजी शाळांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्यासाठी आरटीई योजना राबविण्यात येते. खेड तालुक्यात यावर्षी जवळपास 864 प्रवेश लॉटरी पद्धतीने निश्चित करण्यात आले. पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी अमोल जंगले यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया पार पडली. मात्र, नियमात बसत नसल्याचे कारण देत अनेक पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज जाणीवपूर्वक बाद करण्यात आल्याचा आरोप पालकांकडून करण्यात येत आहे. तर लॉटरीत मागील क्रमांकावर असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आल्याचीही चर्चा आहे. आरटीई प्रवेश प्रक्रिया. प्रक्रियेदरम्यान पालकांनी जिल्हा शिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांच्याकडे तक्रारी केल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, अॅड. विजयसिंह शिंदे पाटील यांनी जिल्हाभरात आरटीई प्रवेश प्रक्रिया आर्थिक व्यवहारातून झाल्याचा गंभीर आरोप केल्यानंतर खेड तालुक्यातील शिक्षण विभाग चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. “आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना चांगल्या शाळेत शिक्षण मिळावे, या उद्देशाने शासनाने आरटीई योजना सुरू केली आहे. प्रक्रियेदरम्यान पालकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. काही चुकीचे आढळल्यास संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल.” – बाबाजी काळे, आमदार खेड “आळंदी परिसरातील एका शाळेत लॉटरी लागलेल्या सलग 14 विद्यार्थ्यांचे प्रवेश विविध कारणे देत रद्द करण्यात आले. हे कुणाच्या दबावाखाली झाले, याची माहिती समोर आणणार आहोत.” – दिलीप मोहिते पाटील, माजी आमदार खेड