RTE Admission – आरटीई अंतर्गत राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रिया ही शासनाच्या नियमांनुसार पूर्णपणे पारदर्शक, ऑनलाइन व विनामूल्य राबविण्यात येते. या प्रक्रियेमध्ये कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही तसेच अर्ज भरणे, कागदपत्र पडताळणी, संगणकीय लॉटरी व प्रवेश निश्चिती या सर्व टप्प्यांमध्ये कोणत्याही व्यक्ती किंवा मध्यस्थाची आवश्यकता नसते, अशी माहिती महापालिका शिक्षण विभागाच्या वतीने देण्यात आली. अलीकडील काळात काही ठिकाणी आरटीई प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली पालकांकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न होत असल्याचे निदर्शनास आले आहे. काही व्यक्ती स्वतःला शाळेशी किंवा शिक्षण विभागाशी संबंधित असल्याचे भासवून प्रवेश निश्चित करून देण्याचे आमिष दाखवत आहेत. अशा प्रकारे पैसे मागणे किंवा देणे हे पूर्णतः बेकायदेशीर असून यामुळे पालकांची आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता आहे. आरटीई अंतर्गत कोणालाही पैसे देऊन प्रवेश मिळवता येत नाही. प्रवेश प्रक्रिया ही शासनाच्या अधिकृत पोर्टलवर आधारित असून, संगणकीय पद्धतीने लॉटरी काढून विद्यार्थ्यांची निवड केली जाते. अर्जाची पडताळणी ही केवळ सादर केलेल्या कागदपत्रांवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीकडे पैसे देऊन प्रवेश मिळेल, असे सांगितले जात असल्यास ते दिशाभूल करणारे आहे, असे देखील शिक्षण विभागातून स्पष्ट करण्यात आले. पिंपरी चिंचवड महापालिका. पालकांनी अशी घ्यावी काळजी कोणत्याही एजंट, मध्यस्थ किंवा अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नये. प्रवेश प्रक्रियेसाठी कोणालाही रोख, ऑनलाइन किंवा इतर कोणत्याही स्वरूपात पैसे देऊ नयेत. केवळ शासनाच्या अधिकृत आरटीई पोर्टलवरूनच अर्ज करावा आणि अर्जाची स्थिती स्वतः तपासावी. कागदपत्र पडताळणी करताना संबंधित शाळा किंवा अधिकृत केंद्रातच उपस्थित राहावे. अधिकृत पावतीशिवाय कोणतीही रक्कम देऊ नये. जर कोणतीही व्यक्ती आरटीई प्रवेशासाठी लाच किंवा पैशांची मागणी करत असल्याचे आढळल्यास, नागरिकांनी तत्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग किंवा जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी. तसेच शिक्षण विभाग, पिंपरी चिंचवड महापालिका यांना याबाबत कळवावे. शक्य असल्यास संबंधित संभाषण, कागदपत्रे किंवा अन्य पुरावे जतन करून सादर करावेत. तक्रारदाराची ओळख गोपनीय ठेवण्यात येईल व योग्य ती कारवाई करण्यात येईल. “आरटीई अंतर्गत प्रवेश प्रक्रिया ही पूर्णपणे पारदर्शक, संगणकीकृत व विनामूल्य आहे. कोणत्याही पालकांनी प्रवेशासाठी कोणालाही पैसे देऊ नयेत. काही व्यक्ती चुकीची माहिती देऊन पालकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र अशा गैरप्रकारांना शिक्षण विभागाकडून कडक कारवाई करण्यात येईल.” – ममता शिंदे, उपायुक्त, शिक्षण विभाग, पिंपरी चिंचवड महापालिका