ATS: पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या नेटवर्कवर एटीएसचा मोठा प्रहार; पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये धाडी
ATS :अनेक संशयित ताब्यात, सोशल मीडियातून तरुणांना जाळ्यात ओढल्याचा संशय

पुणे – महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी संबंधित संशयित नेटवर्कविरोधात पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात मोठी कारवाई केली आहे. या कारवाईदरम्यान अनेक ठिकाणी एकाचवेळी धाडी टाकण्यात आल्या असून, अनेक संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.
एटीएसच्या प्राथमिक तपासानुसार, शहजाद भट्टी आणि त्याच्या साथीदारांनी फेसबुक, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि व्हॉट्सअॅप यांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करून तरुणांशी संपर्क साधण्याचा आणि त्यांच्यावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचा संशय आहे. या माध्यमातून काही तरुणांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांचा गैरवापर करण्याचा कट रचला जात असल्याची माहिती तपास यंत्रणांना मिळाली होती.
या माहितीच्या आधारे एटीएसने पुणे व पिंपरी-चिंचवडमधील विविध ठिकाणी छापेमारी करून इलेक्ट्रॉनिक उपकरणे, मोबाईल फोन आणि अन्य महत्त्वाचे पुरावे जप्त केले आहेत. ताब्यात घेतलेल्या संशयितांची कसून चौकशी सुरू असून, या नेटवर्कचे इतर धागेदोरे शोधण्याचे काम सुरू आहे. या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू असून, चौकशीनंतर आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता एटीएसच्या सूत्रांनी व्यक्त केली आहे.





