pune : कारागृहातील तलावाची साठवण क्षमता वाढली
Pune:

गाळमुक्तीमुळे भूजल पातळीत वाढ होण्याची अपेक्षा
pune : महापालिका आणि इंडविश वेल्फेअर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने येरवडा मध्यवर्ती कारागृहाच्या रवडा (खुल्या) कारागृह परिसरातील पाच एकर क्षेत्रातील तलावाची गाळमुक्ती पूर्ण करण्यात आली आहे.
या कामामुळे तलावाची पाणी साठवण क्षमता तब्बल १ कोटी लिटरने वाढली असून, परिसरातील भूजल पातळी उंचावण्यास मोठी मदत होणार आहे या उपक्रमाअंतर्गत तलावातून १० हजार ९३१ घनमीटर गाळ काढण्यात आला.
काढलेला गाळ तलावालगतच्या सुमारे तीन एकर खडकाळ शेतजमिनीवर टाकून ती जमीन सुपीक करण्यात आली आहे. त्यामुळे जलसंधारणाबरोबरच जमिनीची उत्पादकता वाढण्यासही मदत होणार आहे. परिणामी परिसरातील भूजल पातळीत वाढ होऊन आजूबाजूच्या विहिरींना अधिक काळ पाणी उपलब्ध राहण्यास मदत होणार आहे.
या उपक्रमाला महाराष्ट्र राज्याचे अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक (कारागृह) डॉ. सुहास वारके, विशेष कारागृह महानिरीक्षक योगेश देसाई आणि कारागृह उपमहानिरीक्षक (पश्चिम विभाग) सुनील ढमाळ यांचे मार्गदर्शन लाभले. येरवडा खुल्या कारागृहाचे अधीक्षक शामकांत शेडगे यांच्या हस्ते कामाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी इंडविश वेल्फेअर फाउंडेशनचे संचालक भूपेंद्र मुजुमदार, पुणे समन्वयक संजय परळीकर, राजेंद्र ढमाळे, समीर धर्माधिकारी, कारागृहाचे जेलर नागेश कांबळे, चंद्रकांत खांदवे उपस्थित होते. कारागृहातील कर्मचारी आणि बंदी यांनीही या कामात सक्रिय सहभाग नोंदविला.
महापालिकेचाही हातभार
या उपक्रमासाठी महापालिकेच्या वतीने आयुक्त नवल किशोर राम, अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर, बिपीन शिंदे आणि दिलीप पांडकर यांच्या माध्यमातून १५ दिवसांसाठी एक पोकलेन आणि दोन डंपर उपलब्ध करून देण्यात आले. दरम्यान, सध्या सुरू असलेल्या पावसामुळे उर्वरित काम तात्पुरते स्थगित करण्यात आले असून, जमीन सुकल्यानंतर ते पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती इंडविश वेल्फेअर फाउंडेशनने दिली.





