IND vs ENG : ‘भारताने मँचेस्टरमध्येच गमावली कसोटी मालिका…’, तिसऱ्या दिवशीच पीटरसनने पराभवावर केला शिक्कामोर्तब

IND vs ENG Kevin Pietersen Predicts England Series Win : अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीमध्ये इंग्लंड संघाने २-१ अशी आघाडी घेतली असून, मँचेस्टर कसोटीपूर्वीच त्यांनी भारताला बॅकफूटवर ढकलले आहे. या मालिकेतील दोन सामन्यांचा निकाल अजून बाकी आहे, पण इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केविन पीटरसन याने मँचेस्टर कसोटीच्या तिसऱ्या दिवशीच इंग्लंडने ही मालिका जिंकल्याचा दावा केला आहे. पीटरसनने एक्सवर पोस्ट करत हा दावा केला आहे.
पीटरसनने भारताच्या पराभवाचं केलं भाकीत –
शुक्रवारी एक्सवर पोस्ट करताना केविन पीटरसन म्हणाला, “इंग्लंड तिसऱ्या दिवशी फलंदाजी करत राहील आणि भारताने ही मालिका गमावली आहे.” सध्या भारत १-२ अशा फरकानेने पिछाडीवर आहे. जर इंग्लंडने मँचेस्टर कसोटी जिंकली, तर त्यांना ३-१ अशी विजयी आघाडी मिळेल. भारतीय संघाच्या सध्याच्या कामगिरीवरून पीटरसनने हा अंदाज वर्तवला आहे. भारताने मँचेस्टर कसोटीत पहिल्या डावात ३५८ धावा केल्या, पण इंग्लंडने सहजपणे आघाडी घेतली. आता प्रश्न आहे की, भारत इंग्लंडला किती धावांवर रोखू शकेल आणि दुसऱ्या डावात त्यांचे फलंदाज काय कमाल दाखवतील?
England bat all of today, series over – England win.
— Kevin Pietersen🦏 (@KP24) July 25, 2025
भारताची रणनीती ठरली पूर्णपणे अपयशी –
मँचेस्टर कसोटीत भारताची रणनीती पूर्णपणे फसली आहे. भारताने या सामन्यात पुन्हा एकदा कुलदीप यादवला वगळले, याचा परिणाम मँचेस्टरच्या सपाट खेळपट्टीवर दिसला. भारतीय गोलंदाजांना लवकर विकेट्स मिळाल्या नाहीत. इंग्लंडच्या पहिल्या चार फलंदाजांनी प्रत्येकी पन्नासपेक्षा जास्त धावा केल्या, तर क्रॉली आणि डकेट यांनी वेगवान फलंदाजी करत धावा जोडल्या. जसप्रीत बुमराहलाही या सामन्यात विशेष प्रभाव पाडता आला नाही. यामुळेच भारतीय संघावर पराभवाचे सावट आहे.
हेही वाचा – IND vs ENG : जो रुटने रचला इतिहास! रिकी पॉन्टिंगला मागे टाकत केला खास पराक्रम
जो रुटने मोडला सचिनचा विक्रम –
पहिल्या डावात जो रुटने इंग्लंडसाठी २४८ चेंडूत सर्वाधिक १५० धावांची खेळी साकारली. तसेच त्याने इंग्लंडच्या भूमीवर कसोटी सामन्यांमध्ये २३ वे शतक पूर्ण केले. यासह, तो मायदेशात सर्वाधिक कसोटी शतके झळकावण्याच्या बाबतीत संयुक्तपणे पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याने महेला जयवर्धने, जॅक कॅलिस आणि रिकी पॉन्टिंग यांची बरोबरी केली आहे. जयवर्धनेने श्रीलंकेत २३ कसोटी शतके, कॅलिसने दक्षिण आफ्रिकेत आणि पॉन्टिंगने ऑस्ट्रेलियात केली होती. तर सचिनने भारतात २२ कसोटी शतके झळकावली होती. आता रूटने मायदेशात सर्वाधिक कसोटी शतके झळकावण्याच्या बाबतीत महान फलंदाज तेंडुलकरच्या पुढे गेला आहे.





