Ketan Agrawal Case : केतन अग्रवाल प्रकरणाला नवं वळण; धक्कादायक माहिती आली समोर
पुण्यातील हाय-प्रोफाइल केतन अग्रवाल हत्या प्रकरणाला (Ketan Agrawal Case) आता एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक वळण मिळाले आहे.

Ketan Agrawal Case : पुण्यातील हाय-प्रोफाइल केतन अग्रवाल हत्या प्रकरणाला (Ketan Agrawal Case) आता एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक वळण मिळाले आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पुणे पोलिसांच्या हाती आतापर्यंतचा सर्वात मोठा आणि चक्रावून टाकणारा पुरावा लागला असून, मुख्य आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांच्यातील एका मोठ्या गुपिताचा पर्दाफाश झाला आहे.
६ महिन्यांच्या डिजिटल डेटावरून गुपित उघड
लोणावळ्याजवळील ऐतिहासिक लोहगड किल्ल्यावरून १८ जून रोजी केतन अग्रवाल (Ketan Agrawal Case) याला दरीत ढकलून त्याची क्रूरपणे हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी त्याची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांना ताब्यात घेतले आहे.
तपासादरम्यान पोलिसांनी आरोपींच्या जप्त केलेल्या मोबाईलमधील गेल्या ६ ते ७ महिन्यांमधील कॉल रेकॉर्ड्स, लोकेशन डेटा, व्हॉट्सॲप चॅट्स आणि इंटरनेट सर्च हिस्ट्रीची कसून तपासणी केली. या डिजिटल पुराव्यांचे विश्लेषण केले असता, पोलिसांना समजले की सिया आणि चेतन यांनी सुमारे चार महिन्यांपूर्वीच त्यांच्या कुटुंबीयांना कोणतीही कल्पना न देता गुपचूप विवाह केला होता.
कुटुंबाच्या भीतीने लग्न ठेवले लपवून
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सिया आणि चेतन यांच्यात प्रेमसंबंध होते. मात्र, या प्रेमविवाहाला कुटुंबाकडून तीव्र विरोध होईल अशी भीती त्या दोघांनाही होती. याच भीतीपोटी त्यांनी आपले लग्न सर्वांपासून लपवून ठेवले होते. पोलिसांच्या प्राथमिक संशयानुसार, या गुप्त लग्नानंतरच केतन अग्रवालला वाटेतून हटवण्यासाठी त्याच्या हत्येचा संपूर्ण कट रचण्यात आला होता.
सिया घाबरल्याने हत्येचा पहिला प्रयत्न फसला होता
पोलीस तपासात केवळ या गुप्त लग्नाचाच नाही, तर हत्येच्या एका पूर्व नियोजित अपयशी प्रयत्नाचाही खुलासा झाला आहे. आरोपींनी केतन अग्रवालचा (Ketan Agrawal Case) गेम बजावण्याचा पहिला प्रयत्न १८ जूनच्या आधी, म्हणजेच १४ जून रोजी केला होता. मात्र, अगदी शेवटच्या क्षणी सिया गोयल हिची हिंमत खचली आणि ती प्रचंड घाबरली.
सियाच्या या भीतीमुळे त्यांचा तो पहिला प्लॅन पूर्णपणे फसला होता. परंतु, त्यानंतर चारच दिवसांत म्हणजेच १८ जूनला त्यांनी दुसऱ्या प्रयत्नात केतनला लोहगड किल्ल्यावरून दरीत ढकलून दिले.
पुणे पोलीस सध्या या प्रकरणातील आर्थिक आणि वैयक्तिक बाबींचा अधिक सखोल तपास करत असून, जप्त केलेल्या डिजिटल पुराव्यांच्या आधारे न्यायालयात सबळ बाजू मांडण्याची तयारी करत आहेत.






