Ketan Aggarwal Case : केतन अग्रवाल प्रकरणात नवा ट्विस्ट; चेतनचा वर्गमित्र पोलिसांच्या ताब्यात, मोठी माहिती समोर
Ketan Aggarwal Case : केतन अग्रवालच्या खुनाचे नियोजन चेतन चौधरी आणि सिया गोयल यांनी त्याच्यासोबत चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे.

पुणे : केतन अग्रवाल खूनप्रकरणाच्या तपासात आणखी एक महत्त्वाचा धागा पुणे ग्रामीण पोलिसांच्या हाती लागला आहे. या खुनाच्या कटाची माहिती चेतन चौधरीच्या एका वर्गमित्रालाही असल्याचे तपासात समोर आले आहे. संबंधित तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेऊन सखोल चौकशी सुरू केली आहे.
तपासानुसार, हा तरुण मूळचा बीड जिल्ह्यातील असून सध्या बालेवाडी येथील एका खासगी कंपनीत नोकरी करतो. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून तो चेतन चौधरीच्या संपर्कात होता. केतन अग्रवालच्या खुनाचे नियोजन चेतन चौधरी आणि सिया गोयल यांनी त्याच्यासोबत चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे.
याचबरोबर, 18 जून रोजी लोहगडावर येण्याचा आग्रहही चेतन आणि सियाने या तरुणाकडे केला होता. मात्र, तो त्या दिवशी लोहगडावर गेला नसल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. तपासातील आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, केतन अग्रवालचा खून झाल्यानंतर चेतन चौधरी सर्वप्रथम याच मित्राला भेटल्याची माहिती समोर आली आहे. तसेच सिया गोयलनेही या तरुणाशी संपर्क साधल्याचे उघड झाले आहे.
दरम्यान, या तरुणाने चेतन आणि सिया या दोघांना “केतनचा खून करू नका” असा सल्ला दिल्याची माहितीही तपासातून समोर येत आहे. या सर्व घडामोडींमुळे केतन अग्रवाल खूनप्रकरणाच्या तपासाला नवे वळण मिळाले असून, या तरुणाच्या चौकशीतून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे.





