Ketan Agarwal Case : “केतनसोबत जे झालं ते योग्यच,…”; पुण्याच्या हायप्रोफाईल मर्डर केसला धक्कादायक वळण!
पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा मुलगा केतन अग्रवाल (Ketan Agarwal Case) याची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली.

Ketan Agarwal Case : ज्या घरात काही दिवसांतच लग्नाचे सनई चौघडे वाजणार होते आणि नातेवाईक वऱ्हाडी म्हणून एकत्र येणार होते, त्याच घरात आज केवळ शोक आणि स्मशान शांतता पसरली आहे. पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा मुलगा केतन अग्रवाल (Ketan Agarwal Case) याची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली.
केतनने सिया गोयलसोबत लग्न करून सुखी संसाराचे स्वप्न पाहिले होते. मात्र, सियानेच तिचे प्रेमसंबंध लपवून केतनचा घात केला. या संपूर्ण कटात तिला तिचा प्रियकर चेतन चौधरी याने साथ दिली.
फेब्रुवारी महिन्यात या दोघांचा साखरपुडा झाला होता आणि नोव्हेंबरमध्ये जयपूरमधील एका १४ कोटींच्या पॅलेसमध्ये दोन खासगी विमानांच्या बुकींगसह शाही विवाह सोहळा पार पडणार होता.
परंतु, त्यापूर्वीच सिया आणि चेतनने लोहगडावरून ढकलून केतनची हत्या केली. आधी हा अपघात वाटत असला तरी पोलिसांनी तपासाअंती या क्रूर हत्येचा पर्दाफाश केला आहे. या घटनेमुळे संपूर्ण देशात संतापाची लाट असून दोघांना फाशी देण्याची मागणी होत असतानाच, आता या प्रकरणाला एक वेगळे (Ketan Agarwal Case) आणि धक्कादायक वळण मिळाले आहे.
सगळीकडे आरोपींवर चिखलफेक होत असताना, एका महिलेने मात्र थेट आरोपी सिया गोयलची बाजू घेत तिचे समर्थन केले आहे. इतकेच नव्हे तर, तिने केतन अग्रवालसोबत जे झाले ते योग्यच होते, असे म्हणत सियाच्या जामिनाची मागणी केली आहे, ज्यामुळे सोशल मीडियावर नवा वाद पेटला आहे.
‘मूलगामी बहुजन स्त्रीवादी’ महिलेचा खळबळजनक दावा
ट्विटरवर (X) स्वतःची ओळख ‘सामाजिक-राजकीय भाष्यकार’ आणि ‘मूलगामी बहुजन स्त्रीवादी’ अशी करून देणाऱ्या प्रियांका देशमुख नावाच्या महिलेने या संदर्भात अत्यंत आक्षेपार्ह आणि खळबळजनक ट्विट्स केले आहेत.
प्रियांका देशमुखच्या मते, सिया गोयल ही गुन्हेगार नसून परिस्थितीची बळी आहे. तिने दावा केला आहे की, सियाला तिच्या पालकांनी तिच्या इच्छेविरुद्ध एका नको असलेल्या विवाहात अडकवले होते, तर प्रत्यक्षात सियाला केवळ तिचे उच्च शिक्षण पूर्ण करायचे होते.
प्रियांकाने पोलिसांच्या तपासावरही गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तिच्या मते, केतन अग्रवालचा (Ketan Agarwal Case) मृत्यू हा केवळ एक ‘अपघात’ होता, परंतु पोलिसांनी या प्रकरणाला हत्येचे रूप देऊन सियाला खोट्या गुन्ह्यात अडकवले आहे. पालकांच्या आणि समाजाच्या दबावामुळे पोलिसांनी सियाकडून बळजबरीने गुन्ह्याची कबुली लिहून घेतल्याचा आरोपही तिने केला आहे.
“प्रत्येक अरेंज मॅरेजचा शेवट असाच व्हावा…” वक्तव्याने खळबळ
प्रियांका देशमुख एवढ्यावरच थांबली नाही, तर तिने पुढे बोलताना सर्व मर्यादा ओलांडल्या. तिने आपल्या ट्विटमध्ये उघडपणे लिहिले की, “केतन अग्रवाल याच्यासोबत असंच व्हायला हवं होतं.” याहूनही धक्कादायक वक्तव्य करताना तिने म्हटले की, “देशातील प्रत्येक ‘अरेंज मॅरेज’चा (ठरवून केलेल्या लग्नाचा) शेवट हा असाच तार्किक निष्कर्ष गाठणारा असायला हवा.” तसेच सियाच्या वडिलांनाही समाजाच्या आणि कुटुंबाच्या अशाच प्रकारच्या रोषाचा सामना करावा लागला पाहिजे, असेही तिने नमूद केले.
सोशल मीडियावर तीव्र संताप आणि नेटीझन्सची प्रतिक्रिया
एका क्रूर हत्येचे आणि हत्येच्या आरोपीचे अशा प्रकारे जाहीर समर्थन केल्यामुळे सोशल मीडियावरील युजर्सचा थरकाप उडाला असून लोकांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला आहे. प्रियांका देशमुखच्या या विकृत मानसिकतेवर नेटीझन्सनी कडक शब्दांत टीका केली आहे. एका युजरने संताप व्यक्त करत लिहिले की, “या विकृत मानसिकतेच्या व्यक्तीला नक्की काय झाले आहे? ती खरोखरच अत्यंत दृष्ट आहे आणि नक्कीच ड्रग्जच्या आहारी गेली असावी.”
तर दुसऱ्या बाजूला, अनेकांनी तिच्या या विधानांना निव्वळ प्रसिद्धी मिळवण्याचा आणि समाजात तेढ निर्माण करण्याचा स्टंट म्हटले आहे. अशा विकृत मानसिकतेच्या लोकांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करणेच योग्य राहील, असा सल्लाही अनेक सुजाण नागरिकांनी दिला आहे. एका बाजूला कुटुंब आपल्या मुलाच्या जाण्याने कोलमडले असताना, दुसरीकडे अशा प्रकारच्या वक्तव्यांमुळे या प्रकरणातील वाद आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.






