pune : चापेकर बंधूंच्या शौर्याचे स्मरण

इतिहासप्रेमी मंडळाचा पुणे विद्यापीठ रस्त्यावरील पुतळ्याजवळ उपक्रम
पुणे – प्लेग कमिशनर रँडच्या अत्याचारांना प्रत्युत्तर देत २२ जून १८९७ रोजी गणेशखिंड येथे पराक्रम गाजवणाऱ्या चापेकर बंधूंच्या शौर्याचे स्मरण करत इतिहासप्रेमी मंडळाच्या वतीने शौर्य स्मरण दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ रस्त्यावरील चापेकर बंधूंच्या पुतळ्याजवळ हा कार्यक्रम झाला.
इतिहासप्रेमी मंडळाच्या वतीने गेली २७ वर्षे हा दिवस शौर्य स्मरण दिन म्हणून साजरा केला जात आहे. या वेळी चापेकर बंधू आणि महादेव रानडे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली. त्यानंतर इतिहास अभ्यासक मोहन शेटे यांनी चापेकर बंधूंच्या क्रांतिकार्याचा इतिहास उपस्थितांसमोर उलगडला.
१८५७ च्या स्वातंत्र्यसमरात अपयश आल्यामुळे देशभर नैराश्याचे वातावरण निर्माण झाले होते. अशा काळात वासुदेव बळवंत फडके आणि लोकमान्य टिळक यांच्या विचारांनी प्रेरित होऊन चापेकर बंधूंनी कार्य सुरू केले. त्यांनी लिहिलेल्या कविता आणि आत्मचरित्रातून त्यांच्या प्रखर देशभक्तीचे दर्शन घडते.
आपला राग केवळ रँड या एका व्यक्तीवर नसून संपूर्ण ब्रिटिश साम्राज्यावर आहे, हे दाखवण्यासाठी त्यांनी २२ जून हा राणी व्हिक्टोरियाच्या राज्यारोहणाचा हीरकमहोत्सवी दिवस आपल्या पराक्रमासाठी निवडला. आपण रँडचा वध करणार असल्याचे आगाऊ पत्र पाठवून त्यांनी आपल्या निडर वृत्तीचे दर्शन घडवले.
दामोदर चापेकर यांनी फासावर जाताना हातात भगवद्गीता घेतल्याने क्रांतिकार्याला प्रतिष्ठा प्राप्त झाली. एका कुटुंबातील तीन भाऊ फासावर जाण्याची घटना जागतिक इतिहासात दुर्मिळ असून, ती प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची बाब असल्याचे शेटे म्हणाले.





