Kedgaon Accident : पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; केडगावमध्ये ॲम्ब्युलन्सची कंटेनरला जोरदार धडक, आजोबा-नातवाचा दुर्दैवी मृत्यू
Kedgaon Accident : पुणे-सोलापूर महामार्गावर केडगाव येथे भरधाव ॲम्ब्युलन्सने उभ्या कंटेनरला धडक दिली. या भीषण अपघातात लातूर येथील आजोबा आणि त्यांच्या नातवाचा दुर्दैवी मृत्यू झाला.

Kedgaon Accident : पुणे-सोलापूर महामार्गावर केडगाव गावच्या हद्दीत रविवारी पहाटे भीषण अपघात झाला. भरधाव ॲम्ब्युलन्सने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने आजोबा आणि नातवाचा मृत्यू झाला. ही घटना पहाटे सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास व्यंकटेश पेट्रोलियम पंपासमोर घडली. (Kedgaon Accident)
ॲम्ब्युलन्सवरील नियंत्रण सुटले
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ॲम्ब्युलन्स चालक ओंकार अंतराम कणसे (रा. रेणापूर, जि. लातूर) हा वाहन भरधाव आणि निष्काळजीपणे चालवत होता. त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एमएच २३ एयू १८१७ क्रमांकाच्या कंटेनरला ॲम्ब्युलन्सने जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की ॲम्ब्युलन्समधील दोन प्रवाशांचा मृत्यू झाला. (Kedgaon Accident)
आजोबा-नातवाचा मृत्यू
या अपघातात शेटीबा वडजी मुधोळकर (वय ७०) आणि त्यांचा नातू देवानंद सुरेश मुधोळकर (वय १७) यांचा मृत्यू झाला. दोघेही लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील १२ नंबर पाटी, मांजरा येथील रहिवासी होते. या अपघातात सचिन सुरेश मुधोळकर (वय २५) यांना किरकोळ दुखापत झाली आहे. अपघातात दोन्ही वाहनांचेही मोठे नुकसान झाले. (Kedgaon Accident)
ॲम्ब्युलन्स चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
या प्रकरणी सचिन मुधोळकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून यवत पोलिस ठाण्यात ॲम्ब्युलन्स चालक ओंकार कणसे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांसह मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक किशोर वागज करीत आहेत. पहाटेच्या सुमारास झालेल्या या भीषण अपघातामुळे केडगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. (Kedgaon Accident)





