Pune News : बावधन येथील पेरिविंकलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन दिमाखात साजरा !
चैतन्य विद्या प्रतिष्ठान संचलित पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, बावधन येथे भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन देशभक्ती, उत्साह आणि अभिमानाच्या वातावरणात मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला.

Pune News : चैतन्य विद्या प्रतिष्ठान संचलित पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, बावधन येथे भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन देशभक्ती, उत्साह आणि अभिमानाच्या वातावरणात मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माननीय माणिक डावरे उपस्थित होते. तसेच श्याम उकीडवे, सचिन पारकर, संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र बांदल, संचालिका रेखा बांदल, संचालिका शिवानी बांदल आणि प्राचार्या निर्मल पंडित यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या स्वागताने झाली. त्यानंतर ध्वजपूजन व ध्वजारोहण समारंभ उत्साहात पार पडला. मान्यवरांना असेंब्ली हॉलकडे घेऊन जात असताना जिन्यावर विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, राणी लक्ष्मीबाई तसेच इतर स्वातंत्र्यसैनिकांच्या वेशभूषेत उभे राहून स्वातंत्र्याच्या घोषणा दिल्या. विद्यार्थ्यांच्या या अनोख्या सादरीकरणामुळे संपूर्ण परिसरात देशभक्तीमय आणि भारावून टाकणारे वातावरण निर्माण झाले.
असेंब्ली हॉलमध्ये मान्यवरांचे औपचारिक स्वागत करून त्यांचा सन्मान व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर सुमारे ५० विद्यार्थ्यांनी “तेरा हिमालय आकाश झूमे” या देशभक्तीपर गीताचे सुंदर समूहगीत गायन सादर केले. विद्यार्थ्यांनी इंग्रजी आणि जर्मन भाषेत स्वातंत्र्यदिनानिमित्त भाषणे सादर केली. या माध्यमातून विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर स्पर्धा करण्यासाठी सक्षम बनविण्याबरोबरच त्यांच्यामध्ये विविध भाषा, आत्मविश्वास आणि संवादकौशल्य विकसित करण्यासाठी संस्थेचा असलेला प्रयत्न अधोरेखित झाला.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी डंबेल प्रात्यक्षिक, एरोबिक्स आणि जिम्नॅस्टिक्स यांचे उत्स्फूर्त सादरीकरण केले. तसेच भारतीय सैनिकांच्या संघर्ष, शौर्य आणि बलिदानाचे दर्शन घडविणाऱ्या एका प्रभावी नृत्य सादरीकरणातून भारतीय जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र बांदल यांनी आपल्या प्रेरणादायी भाषणातून शून्यातून विश्व निर्माण करण्याच्या जिद्दीचे उदाहरण म्हणून माणिक डावरे यांचा गौरव केला. “तिरंग्यातच आपला भारत लपलेला आहे,” असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना अखंड आणि सामर्थ्यवान भारत घडविण्यासाठी योगदान देण्याचे आवाहन केले. स्वातंत्र्यलढ्यातील प्रेरणादायी प्रसंग सांगत त्यांनी “इंकलाब जिंदाबाद” यांसारख्या घोषणांमधून देशभक्तीची भावना जागृत केली. खरी देशसेवा म्हणजे देशासाठी काहीतरी करण्याची भावना आणि त्यासाठी कृती करणे, हा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माणिक डावरे सर यांनी विद्यार्थ्यांच्या सर्व सादरीकरणांचे कौतुक केले. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात त्यांनी विद्यार्थ्यांना देशाप्रती असलेल्या कर्तव्यांची जाणीव करून दिली. आज उपलब्ध असलेल्या सुविधा, तंत्रज्ञान आणि संधींबद्दल कृतज्ञ राहून त्यांचा योग्य उपयोग करण्याचे आवाहन त्यांनी केले. सामाजिक व पर्यावरणीय समस्यांसह आजच्या जगासमोरील विविध आव्हानांवर उपाय शोधण्यासाठी विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्यावा, असे त्यांनी सांगितले.
“Lead by Example” बदलाची सुरुवात स्वतःपासून करा, असा प्रेरणादायी संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. रेखा बंडल, संचालिका, यांनी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे कौतुक करत विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. त्यांच्या शब्दांनी विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास आणि पुढे जाण्याची नवी उमेद निर्माण झाली.
अशा प्रकारे विविध देशभक्तीपर आणि सांस्कृतिक सादरीकरणांनी समृद्ध झालेला ८० वा स्वातंत्र्यदिन सोहळा “वंदे मातरम्”च्या सामूहिक गायनाने उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. हा सोहळा केवळ स्वातंत्र्याच्या गौरवशाली इतिहासाचे स्मरण करून देणारा नव्हता, तर देशाच्या उज्ज्वल भविष्याची जबाबदारी आपल्या युवा पिढीच्या खांद्यावर आहे, हा संदेश देणारा प्रेरणादायी सोहळा ठरला.
या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन हे शाळेच्या प्राचार्या निर्मल पंडित यांच्या अध्यक्षतेखाली आणि कणखर नेतृत्वाने पर्यवेक्षिका सायली गायकवाड आणि शिरीन काझी यांच्या सहकार्याने व सर्व शिक्षकवृंद आणि विद्यार्थी यांच्या मदतीने करण्यात आले होते.
हा सोहळा केवळ स्वातंत्र्याच्या गौरवशाली इतिहासाचे स्मरण करून देणारा नव्हता, तर देशाच्या उज्ज्वल भविष्याची जबाबदारी आपल्या युवा पिढीच्या खांद्यावर आहे, हा संदेश देणारा प्रेरणादायी सोहळा ठरला. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सायली गायकवाड यांनी केले.





