Pune news : महिला पोलिस कर्मचाऱ्याशी गैरवर्तन; पोलिस हवालदार निलंबित
महिला पोलिस अंमलदाराशी गैरवर्तन केल्याच्या तक्रारीत प्रथमदर्शनी तथ्य आढळून आल्याने पुणे शहर पोलिस दलातील हवालदार किरण दत्तात्रय देशमुख यांना निलंबित करण्यात आले आहे.

Pune news : महिला पोलिस अंमलदाराशी गैरवर्तन केल्याच्या तक्रारीत प्रथमदर्शनी तथ्य आढळून आल्याने पुणे शहर पोलिस दलातील हवालदार किरण दत्तात्रय देशमुख यांना निलंबित करण्यात आले आहे.
देशमुख हे सध्या कोर्ट कंपनीत नियुक्त होते. याबाबत पोलिस उपआयुक्त, मुख्यालय पी. आर. पाटील यांनी १५ ऑगस्ट रोजी निलंबनाचे आदेश काढले.
किरण देशमुख हे यापूर्वी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात कार्यरत असताना महिला पोलिस अंमलदाराशी गैरवर्तन केल्याची तक्रार प्राप्त झाली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी करण्यात आली.
अपर पोलिस आयुक्त, गुन्हे यांनी १३ ऑगस्ट रोजी सादर केलेल्या अंतरिम अहवालात तक्रारीत प्रथमदर्शनी तथ्य असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
देशमुख यांचे वर्तन बेशिस्त, नैतिक अधःपतनाचे तसेच शिस्तबद्ध पोलिस दलाची प्रतिमा मलिन करणारे असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध करण्यात येणाऱ्या विभागीय चौकशीच्या अधीन राहून त्यांना शासकीय सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.
निलंबनाच्या कालावधीत त्यांना नियमानुसार निर्वाह भत्ता मिळणार आहे. मात्र, या काळात त्यांनी कोणतीही खासगी नोकरी किंवा व्यवसाय स्वीकारून उत्पन्न मिळवू नये, अन्यथा निर्वाह भत्त्याचा अधिकार गमवावा लागणार आहे.
तसेच निलंबनाच्या काळात रजा देय नसून पोलिस मुख्यालय सोडण्यासाठी पोलिस उपआयुक्तांची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.
निलंबित हवालदाराला नियमितपणे पोलिस मुख्यालयातील राखीव पोलिस निरीक्षकांकडे हजेरी देण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.





