Katraj Kondhwa Road: महापालिकेत राडा! १६ वर्षीय मुलीचा अपघाती मृत्यू; कात्रज-कोंढवा रस्त्यावरून विरोधक आक्रमक
Katraj Kondhwa Road: भूसंपादनाच्या अडचणींमुळे ८४ मीटरऐवजी ५० मीटर रस्त्याचे नियोजन; आणखी १० जागा ताब्यात घेण्याचे काम सुरू असल्याची मुख्य अभियंत्यांची माहिती.

Katraj Kondhwa Road – कात्रज-कोंढवा रस्ता गेल्या सात-आठ वर्षांपासून रखडलेला असताना दोन दिवसांपूर्वी याच रस्त्यावर १६ वर्षीय मुलीचा अपघाती मृत्यू झाल्याने महापालिकेच्या मुख्यसभेत विरोधकांनी प्रशासनाला धारेवर धरले. अर्धवट रस्त्यामुळे आणखी किती पुणेकरांचा बळी जाण्याची वाट पाहत आहात, असा संतप्त सवाल करीत विरोधी नगरसेवकांनी सभागृहात आंदोलन केले.
न्याय द्या, न्याय द्या, चिमुकलीला न्याय द्या; प्रशासनावर कारवाई झालीच पाहिजे, अशी घोषणाबाजीही करण्यात आली. कात्रज-कोंढवा रस्ता अर्धवट असतानाच त्याच्या मागून समृद्धी महामार्गाचे काम पूर्ण होते, मग महापालिका प्रशासन नेमके करते काय, असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला. या दुर्घटनेला जबाबदार असलेल्या प्रशासनावर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली.
विरोधी पक्षनेते ॲड. निलेश निकम, काँग्रेसचे गटनेते चंदू कदम, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे गटनेते काका चव्हाण, नगरसेवक अरविंद शिंदे यांच्यासह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नगरसेवक आंदोलनात सहभागी झाले. तर प्रशासनाच्या वतीने मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर यांनी खुलासा केला. कात्रज-कोंढवा रस्ता आराखड्यात ८४ मीटरचा दर्शविण्यात आला आहे.
मात्र, जागामालकांकडून रोख मोबदल्याची मागणी होत असल्याने तडजोडीने जागा ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. सध्या हा रस्ता ५० मीटर करण्याचे नियोजन असून, आणखी १० जागा ताब्यात येणे बाकी आहे. भूसंपादन ही मोठी अडचण असल्याने काम रखडले. अपघाताची घटना दुर्दैवी असून, सध्या काम वेगाने सुरू आहे. येत्या सहा महिन्यांत रस्त्याचे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याचे पावसकर यांनी स्पष्ट केले.





