Pune news : “काळी माती जपली तरच पुढची पिढी टिकेल” – पद्मश्री राहीबाई पोपेरे
प्रत्येकाच्या ताटात विषमुक्त भाजी जायला हवी. काळी आई आपल्याला अन्न देते, ती आपण वाचवायला हवी. तरच पुढची पिढी टिकेल, असे विचार पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनी मांडले.

Pune news – मी निसर्गाची आणि मातीची शाळा शिकले आहे. गरीबी आली तरी लाजू नये आणि श्रीमंती आली तर माजू नये, हे मला वडिलांनी शिकविले. आज आपण जे दिसायला चांगले पण आरोग्याला घातक आहे ते खात आहोत.
त्यामुळे चारच भाज्या खा, पण आरोग्य चांगले ठेवा. प्रत्येकाच्या ताटात विषमुक्त भाजी जायला हवी. काळी आई आपल्याला अन्न देते, ती आपण वाचवायला हवी. तरच पुढची पिढी टिकेल, असे विचार पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनी मांडले.
नर्हे येथील जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटस् च्या १३ व्या वर्धापनदिनानिमित्त संस्थेच्या सभागृहात पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष प्रा. डॉ. सुधाकरराव जाधवर होते.
यावेळी ज्येष्ठ संपादक विजय बाविस्कर, संस्थेचे उपाध्यक्ष अॅड. शार्दुल जाधवर, खजिनदार सुरेखा जाधवर यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात यंदाचा प्रतिष्ठेचा जीवनगौरव पुरस्कार माजी खासदार तथा समाजसेवक प्रा. जोगेंद्र कवाडे यांना प्रदान करण्यात आला.
याशिवाय, राहीबाई पोपेरे यांना कृषी क्षेत्रातील, राज्य शिक्षण मंडळ, पुणेचे अध्यक्ष औदुंबर उकिरडे यांना शैक्षणिक क्षेत्रातील, प्रसिद्ध सिने अभिनेता मिलिंद शिंदे यांना कला क्षेत्रातील, पुणे अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष निलेश ढमढेरे यांना सहकार क्षेत्रातील, तर समाज प्रबोधन चॅरिटेबल ट्रस्टचे जयंत हिरे यांना सामाजिक क्षेत्रातील पुरस्काराने गौरवण्यात आले.
जोगेंद्र कवाडे म्हणाले, जो संकटाशी दोन हात करण्याची तयारी ठेवतो आणि न डगमगता त्यावर मात करतो, त्याला कोणीही रोखू शकत नाही. शिस्त, समर्पण आणि दृढनिश्चय या तीन गोष्टी आयुष्यात अत्यंत महत्त्वाच्या आहेत. ॲड. शार्दुल जाधवर यांनी प्रास्ताविकात संस्थेच्या शैक्षणिक प्रवासाचा लेखाजोगा मांडला.





